Homeमहामुंबईपालघर7 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी निषेध मोर्चा

7 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी निषेध मोर्चा

Subscribe

सभेच्या शेवटी निषेध निवेदन पोलीस अधिकार्‍यांना सादर करण्यात आले. या मोर्च्याचे सूत्रसंचालन पालघर जिल्हा सहसचिव पौर्णिमा परेड यांनी केले.

डहाणू : डहाणू येथे 26 जानेवारी रोजी घडलेल्या 7 वर्षीय चिमुकलीवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आज, 3 फेब्रुवारी 2025 रोजी डहाणू बंद आणि निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या बंदला व्यापारी वर्ग, फेरीवाले, रिक्षा संघटना, तसेच विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. मोर्च्याला नरपड गावातून सुरुवात होऊन इराण रोड मार्गे तारपा चौक येथे सभेचे रूप प्राप्त झाले. या वेळी आदिवासी एकता परिषदेचे राज्य सचिव तथा आदिवासी समन्वय मंच भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनिल पर्‍हाड, केंद्रीय अध्यक्ष मंडळ सदस्य राजू पांढरा, कीर्ती वरठा, जिल्हा सचिव प्रदीप ढाक, महिला संघटक मोहिनी खरपडे, ऑल इंडिया एम्प्लॉय फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष माधव लीलका, मनसे तालुका अध्यक्ष विपुल पटेल, यशोधन पाटील, ऍड. देऊ नारले, नरपड सरपंच चेतना उराडे, वाकी सरपंच दिनकर दयात, युट्युबर अरविंद बेंडगा, गजानन पागी, राष्ट्रीय दलित पँथरचे विनायक जाधव यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या मोर्च्यात सहभाग घेतला.

सभेच्या शेवटी निषेध निवेदन पोलीस अधिकार्‍यांना सादर करण्यात आले. या मोर्च्याचे सूत्रसंचालन पालघर जिल्हा सहसचिव पौर्णिमा परेड यांनी केले. मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत आक्रोश मोर्च्याचा समारोप करण्यात आला.
या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण डहाणू शहर बंद ठेवण्यात आले होते. समाजातील सर्व स्तरातून या निषेधाला भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी केली.


Edited By Roshan Chinchwalkar