विरार : पालिकेला उपलब्ध झालेल्या १८५ एमएलडी पाणी साठ्यावरील ६९ गावातील नागरिकांना पालिकेमार्फत पाणी मिळावे यासाठी जिल्हा काँग्रसने पुढाकार घेवून सतत पाठपुरावा केला होता, त्यास यश आले. काँग्रेस नेते विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची मंगळवारी (दि. ११ फेब्रुवारी) भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऑनील आल्मेडा यांना गुरुवारी (दि. १३) रोजी लेखी पत्र देत म्हटले आहे की, ६९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेतील समाविष्ट ५२ गावातील जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडीट महापालिकेमार्फत करण्यात आले असून प्राप्त स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानुसार जलकुंभ दुरूस्तीकरिता पाच कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याकामी निविदा मागविण्यात आल्या असून निविदा मंजुरीची कार्यवाही सुरू आहे.
जलकुंभ दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर ते वापरात आणण्याचे नियोजन असल्याचे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांना दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. पालिका आयुक्तांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंमलबजावणी केलेल्या वसई-विरार उपप्रदेशात ६९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेबाबत ६९ गावांची पाणी पुरवठा योजना ६९ गावांची पिण्याचे पाणी पुरवठा योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना असून त्यांच्याकडून ती राबविण्यात आली आहे. सदर योजनेकरीता लागणार्या आवश्यक नळ जोडण्या या महानगरपालिकेमार्फत म.जी.प्रा. यांस देण्यांत आलेल्या आहेत. या योजनेमधील एकूण ५२ गावे महापालिकेत समाविष्ट असून ५२ गावांपैकी २९ गावांना महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा सुरू झाला आहे. उर्वरीत गावांपैकी नाळे, मर्देस, निर्मळ, भुईगांव (बु.) आणि उमराळे या गावातील जलकुंभापर्यंत अंथरण्यात आलेली मुख्य जलवाहिनी व डीआय वितरण जलवाहिन्यांची जलदाब चाचणी पूर्ण झाली असून सदर गावांमध्ये सार्वजनिक / ग्रुप नळजोडण्या महापालिकेमार्फत लवकरच देण्यात येणार आहेत. पत्रात पुढे म्हटले आहे की, एमएमआरडीएच्या सुर्या ४०३ द.ल.ली. योजनेतून पालिकेस १६५ द.ल.ली. पाणी उपलब्ध होणार आहे. नोव्हेंबर, २०२३ पासून १०० द.ल.ली. पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून मुख्य जलवाहिन्यांची जलदाब चाचणीची कामे पूर्ण करून टप्प्या-टप्प्याने पाण्यात वाढ केली आहे. सद्यःस्थितीत १३० ते १४० द.ल.ली. पाणी उपलब्ध होत आहे. अमृत २.० योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात समाविष्ट गावांमध्ये नव्याने मुख्य व वितरण जलवाहिन्या अंथरणे प्रस्तावित करण्यात आले आहे. अमृत २.० योजनेअंतर्गत मंजूर ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आले असून कामे प्रगतीपथावर असल्याचेही पालिका आयुक्त पवार यांनी पत्रात म्हटले आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळात प्रदेश सचिव निलेश पेंढारी, व्हिन्सेंट परेरा, रुपेश रोड्रिक्स, रामदास वाघमारे, अरनॉल्ड जिगुल,रॉइस फरेल,सोहेल चौधरी,आदींचा समावेश होता.