वसईः मंगळवारपासून वसई ते भाईंदर दरम्यान सुरु करण्यात आलेली रो-रो फेरीबोट सेवा प्रायोगिक तत्वावर असून सरकारी लोकार्पण सोहळा झालेला नाही, असा खुलासा करत मुंबई महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य बंदर अधिकार्यांनी उत्साही पुढार्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. गेले अनेक दिवस चर्चेत असलेली वसई ते भाईंदर दरम्यानची रो-रो फेरीबोट सेवा २० फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली. यावेळी विविध पक्षांच्या पुढार्यांमध्ये श्रेय लाटण्याची स्पर्धा पहावयास मिळाली. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर, शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यासह विविध पक्षांचे पुढारी यावेळी हजर होते. भाजपच्या पदाधिकार्यांनी तर पक्षाचे झेंडे हातात घेत बोटीवरच जल्लोष साजरा केला. तर बहुजन विकास आघाडी आणि खासदार राजन विचारे यांच्या समर्थकांनी आपल्या प्रयत्नानेच रो-रो फेरीबोट सुरु झाल्याचा दावा करत प्रचार केला.
यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा यांनी खुलासा करत रो-रो सेवेचा लोकार्पण सोहळा झाला नसून वर्तमानपत्रांमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यात तथ्य नसल्याचे जाहिर केले आहे. खरा यांच्या खुलासाने श्रेयासाठी धडपडणार्या अतिउत्साही पुढार्यांना चपराक लगावली आहे.वसई आणि भाईंदर ही शहरे एकमेकांना जलमार्गाने जोडण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मे. सुवर्णदूर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या ऑपरेटर संस्थेद्वारे २० फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात आलेली वसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सेवा ही तूर्तास फक्त प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आलेली आहे. मात्र, या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारिक शासकीय लोकार्पण सोहळा अद्याप झालेला नाही, असे कॅप्टन खरा यांनी म्हटले आहे.
तूर्तास या फेरीबोटीचे जलमार्गातून होणारे नौकानयन तसेच बोटीतून प्रवासी व वाहनांची जेट्टीवर चढ-उतार सुलभ व सुरक्षितपणे होत आहे किंवा कसे, या बाबींचा महाराष्ट्र सागरी मंडळाकडून अभ्यास करण्यात येत आहे. या सर्व बाबींची एकदा खात्री झाल्यानंतरच, फेरीबोट सेवेचा शासकीय लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे, असेही कॅप्टन प्रवीण खरा यांनी म्हटले आहे. दरम्यान, रो-रो फेरीबोट सेवेला पर्यटकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. वसई आणि मीरा भाईंदर परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने फेरीबोटीतून सहकुटुंब, मित्रमैत्रीणींसह फेरफटाका मारत समुद्र सफरीची मजा लुटताना दिसत आहेत. असाच प्रतिसाद मिळत राहिल्यास फेरीबोट सेवा कायमस्वरुपी नियमितपणे सुरु राहिले, असे सांगण्यात आले.