वसई : विरारपर्यंत प्रस्तावित असलेल्या सागरी सेतू प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असून ५५ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी राज्य सरकारच्या मान्यतेसाठी हा आराखडा व प्रकल्प एमएमआरडीएमार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गासाठी ८७ हजार कोटींच्या खर्च होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. बहुउद्देशीय असलेला हा सागरी सेतू मुंबई- दिल्ली एक्सप्रेस वे आणि पुढे विरारजवळ जोडला जाणार आहे. त्यामुळे गुजरात दिल्लीवरून या मार्गाने थेट मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निधीची आवश्यकता असून जपानच्या जीका संस्थेकडून कर्ज उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला एकदा मान्यता दिल्यास परदेशीय वित्तीय संस्थांकडून कर्ज मंजुरी घेण्यासाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. उत्तन ते विरार सागरी मार्ग दक्षिण मुंबईला जोडला जाणार असल्यामुळे नरिमन पॉईंट ते विरार असा प्रवास अवघ्या काही तासात करता येणे शक्य होणार आहे. भाईंदर येथील सुभाष चंद्र बोस उद्यानाजवळ हा मार्ग सुरू होणार असून पालघर जिल्ह्यातील विरार बापाने येथे जोडला जाणार आहे.
या मार्गावरून पुढे दिल्ली मुंबई महामार्गाला जोडणी दिली जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी ५५ किलोमीटर इतकी असून २४ किलोमीटरचा सागरी सेतू बांधण्यात येणार आहे. उत्तन येथे दहा किलोमीटर, वसई येथे अडीच किलोमीटर तर विरार येथे जोडणीसाठी १९ किलोमीटरवर कनेक्टर असणार आहेत.