भाईंदर : समुद्रात चालणार्या बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच ड्रोन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ड्रोनद्वारे मत्स्य व्यवसाय विभाग समुद्रातील बेकायदा मासेमारीवर नजर ठेवत आहे. परंतु या ड्रोन यंत्रणेचा अधिकृतपणे मासेमारी करणार्या मच्छीमारांनाच फटका बसत आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गीलनेट पद्धतीने मासेमारी करण्यार्या पारंपरिक मच्छिमारांवर मत्स्यव्यवसाय विभागाने चुकीच्या पद्धतीने जारी केलेल्या नोटिसा संदर्भात मच्छिमार कृती समितीने राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन विभागाची चूक निर्दशनास आणून दिली. त्यानंतर राणे यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांना निर्देश देत जारी करण्यात आलेली नोटीस त्वरित मागे घेऊन स्थानिक मच्छिमारांवर करण्यात येणारी कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील एकाही मच्छीमारांच्या नौकेचे नुतनीकरण थांबणार नाही. अथवा डिझेल परतावा रोखणार नसल्याचे आश्वासन मच्छिमारांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.
ड्रोन यंत्रणेच्या माध्यमातून उत्तनमधील आठ मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय विभागाकडून विविध कारणास्तव नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, ड्रोन यंत्रणा अनधिकृत मासेमारीऐवजी अधिकृत मासेमारीलाच जाचक ठरत असल्याचे शिष्टमंडळाने राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मच्छिमार बुमचा वापर जाळी ओढण्यासाठी करत असून पर्ससीन मासेमार बोटींवर हायड्रॉलिक बुम बसविणे कायद्याने गुन्हा आहे. पारंपरिक मच्छिमारांना बुम वापरण्याची बंदी कायद्यात नसल्याचे राणे यांच्या निर्देशनास आणून दिले. पर्ससीन नेट मासेमारी बुम द्वारे एका दिवसात अनेक चकरा मारून समुद्र खाली करण्याचा प्रकार करत असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याउलट दालदा मासेमार हे भरती-ओहोटी वर अवलंबून असल्याने त्यांच्या मासेमारीची चक्कर मोजकीच असल्याने कायद्याचा गैरवापर करून पारंपरिक मच्छिमारांना कारवाई करण्याचा प्रताप पालघर मत्स्यव्यवसाय कार्यालयातून झाल्याचे बैठकीत राणे यांना सांगण्यात आले. बैठकीत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल, कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो, पालघर जिल्हाध्यक्ष विनोद गंगाधर पाटील, महिला अध्यक्षा नयना पाटील, युवा अध्यक्ष मिल्टन सोदिया, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष माल्कम कासुघर, ठाणे जिल्हा सचिव माल्कम भंडारी, उत्तन वाहतूक सहकारी संस्थेचे बोना मालू आणि विल्सन बांड्या आदी उपस्थित होते.