तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सूत्रकार फाटा येथून जाणारा सूत्रकार-वेलूगाव महामार्ग (८४८अ) अपघातांचा केंद्रबिंदू ठरत असून, गेल्या सात दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मागील सहा महिन्यांत ५० हून अधिक अपघात झाले असून, त्यात १२ जणांनी प्राण गमावले आहेत. महामार्गावरील अपूर्ण पुलाच्या कामामुळे वाहतूक धोकादायक ठरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.सूत्रकार काकडपाडा येथील दारोठा नदी (काळू नदी) वरील पुलाचे काम मागील दीड-दोन वर्षांपासून ठप्प आहे. त्यामुळे महामार्गावरील जवळपास २०० मीटर रस्त्याचे काम अपूर्ण असून, याठिकाणी अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा पूल ५०-६० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि एकदा कोसळल्यानंतर केवळ तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, आता तो पुन्हा कोसळण्याच्या स्थितीत आहे. तरीही, प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत.
या पुलावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही वाहतूक सुरूच आहे. अरुंद पूल, अचानक उतार आणि वळणामुळे नवख्या वाहनचालकांना अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी याठिकाणी पुरेशा प्रमाणात दिवे नाहीत, तसेच चमकदार रेडियम फलक, सूचना बोर्ड आणि स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले नाहीत. या हलगर्जीपणामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.या संदर्भात नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क साधला असता, हा रस्ता त्यांच्या अखत्यारीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित यंत्रणांची उदासीनता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. या ठिकाणी त्वरित नवीन पुलाचे बांधकाम सुरू करावे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास, आणखी कित्येक निष्पाप नागरिकांचे जीव जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
“या धोकादायक परिस्थितीमुळे मी आणि माझे ग्रामस्थ यांच्यातीने सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांना कळवू इच्छितो की यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. जर पुलाचे काम त्वरित सुरू करण्यात आले नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा आम्ही देत आहोत.”
– अनिल भुरकुड, ग्रामस्थ.
Edited By Roshan Chinchwalkar