Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईपालघरPratap Sarnaik: दहिसर चेक नाक्यावर प्रभावी उपाययोजना करा

Pratap Sarnaik: दहिसर चेक नाक्यावर प्रभावी उपाययोजना करा

Subscribe

गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हलक्या चारचाकी वाहनांना टोल माफी केली आहे.

भाईंदर : मिरा -भाईंदर शहरातून मुंबईला जायला एकमेव पर्याय असलेला दहिसर टोलनाका येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते.आज त्याची प्रत्यक्ष पाहणी करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ त्याठिकाणी प्रभावी उपाययोजना करून तिथल्या समस्या सोडविण्यास प्रशासनाला सांगितले. टोल नाक्यावर सध्या केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो, त्यामुळे टोल ठेकेदारांनी हमरस्त्यावरील दोन्ही बाजूंनी मुंबईकडे जाताना ३ रांगा आणि येताना २ रांगा (लेन ) या अवजड वाहनांचा टोल घेण्यासाठी चालू ठेवाव्यात. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हलक्या चारचाकी वाहनांना टोल माफी केली आहे.

तरी देखील दररोज सकाळी व संध्याकाळी दहिसर चेक नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. टोल ठेकेदारांनी हमरस्त्यावरील उभारलेल्या वेगवेगळ्या लेन मुळे वाहनांचा वेग मंदावतो. सहाजिकच त्यामुळे लांबलचक रांगा लागतात आणि सर्व सामान्य वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हे दूर करण्यासाठी तातडीने टोल ठेकेदारांनी हमरस्त्यावरील मुंबईकडे जाणार्‍या सहा रांगा पैकी केवळ ३ रांगा आणि येताना ४ पैकी २ रांगा अवजड वाहनांच्या टोल वसुलीला आरक्षित ठेवाव्यात. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा. जेणेकरून हलक्या वाहनांचा अडथळा दूर होऊन जलदगतीने वाहने चेक नाका परिसरातून निघून जातील, पर्यायाने वाहतूक कोंडी होणार नाही. आरक्षित रांगेची माहिती देणारे फलक दोन्ही बाजूने ५०० मीटर पर्यंत लावण्यात यावेत. जेणेकरुन वाहन धारकांना आपली वाहने शिस्तबद्ध रीतीने संबंधित रांगेतून पुढे मार्गस्थ करणे शक्य होईल,अशी सूचना देण्यात आल्या. याचवेळी मंत्री सरनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील एस.के. स्टोन सिग्नल जवळील उड्डाणपुलाच्या बांधकामाची पाहणी केली. अंतिम टप्प्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या १६ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत मिरा -भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, प्रकाश गायकवाड आणि एमएमआरडीएचे मेट्रो लाईन ९ चे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता सचिन कोठावळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी, टोलचे ठेकेदार उपस्थित होते.


Edited By Roshan Chinchwalkar