विरार : वसई- विरार शहर महानगर पालिकेने गुरुवारपासून नालासोपारा पूर्वेकडील विजय लक्ष्मी नगरात कारवाईला सुरुवात केली आहे. दोन दिवसांत तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. मात्र ही कारवाई करत असताना शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रमाण वाढले आहे. कारवाई दरम्यान निघणार्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेची कोणतीही उपायोजना नसल्यामुळे याचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुंबईसह वसई- विरार शहरात मागील काही दिवसांपासून धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शहरातील सर्दी, खोकला आणि दम्याचे आजाराच्या रुग्णांना याचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे पालिकेने शहरातील धुळीची ठिकाणे साफसफाई करून घेतली होती. तर राज्य शासनाने देखील धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
परंतु,आता ४१ इमारतींवर पालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नालासोपारा शहरात कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे शहरात बेसुमार धुळीचे प्रमाण वाढले आहे. पालिकेच्या प्रभाग समिती ‘डी’ च्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. ही कारवाई शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस बंद असणार आहे. आतापर्यंत दोन दिवसांच्या कारवाईत पालिकेने ७२ घरे तोडली आहेत. कारवाई पुन्हा सोमवारपासून पुन्हा मिरा- भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या बंदोबस्तात चालू केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त दीपक सावंत यांनी दिली आहे.