मोखाडा : मोखाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खंडाळा पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीत कारेगाव शिवारात मध्यवैतरणा नदी वरील पुलाखाली अनोळखी ( पुरुष ) व्यक्तीचा मृतदेह शनिवारी दुपारच्या सुमारास आढळून आला आहे.याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात नोंदवली असून पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश काळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन वस्तूस्थितीची पाहणी केली आहे.
मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खोडाळा कसारा राज्यमार्गावरील कारेगाव शिवारात एका अनोळखी पुरुष जातीच्या इसमाचा ( वय अंदाजे २५/३० वर्षे ) शनिवारी ( दि ३ ) रोजी आढळून आला आहे.सदर इसमाच्या डाव्या हातावर राणा रजपूत असे लिहिलेले असून उजव्या हातावर आई, बाबा आणि लव्ह चिन्हा मध्ये इंग्रजी भाषेत एसडी असे लिहिलेले आहे.तसेच त्याने छातीवर सफेद व त्याखाली पिस्ता रंगाचा गोल गळ्याचा टिशर्ट आणि काळ्या रंगाची फुल पँट घातलेली आहे.त्याच्या डोक्यावर, छातीवर आणि हातावर धारदार शस्त्राने वार केले असून कापडी दोराने गळा आवळून जीवे मारुन मध्यवैतरणा पुलाखाली टाकून दिले असल्याची माहिती मोखाडा पोलिसांनी दिली आहे. सदर अनोळखी इसमाचे शवविच्छेदन नाशिक जिल्हा रुग्णालयात केले असून शव जव्हार कॉटेज हॉस्पिटलमध्ये सुरक्षित जतन करुन ठेवले असल्याचे मोखाडा पोलिसांनी सांगितले.