पालघर : भोपोली येथून आपले घरकुल मंजूर झाल्याने त्याचे मंजुरी प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या नारायण रामचंद्र राहणे (वय37 वर्ष) या पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या शेतकर्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील झुडपात मिळून आला. सदर व्यक्ती मागील पाच दिवसापासून बेपत्ता असल्याची नोंद पालघर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायतराज विभागाच्या वतीने 22 फेब्रुवारी रोजी वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाच्या मंजुरी पत्राचे व प्रथम हप्त्याचे वितरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भोपोली येथील अपंग असलेले गरीब शेतकरी रामचंद्र रहाणे हे जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजना मंजुरी पत्राचे स्वीकार करण्यासाठी त्याला येणे शक्य नसल्याने त्यांनी आपला मुलगा नारायण रहाणे याला पाठविले होते. शनिवारी सदर योजनेचे विवरणपत्र स्वीकारण्यासाठी नारायण जिल्हा परिषद कार्यालयात गेले होते.मात्र त्यानंतर तो घरी परत आला नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आला नाही. त्याचा पाच दिवसापासून शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी आपल्या टीम सर्वत्र पाठवल्या होत्या तसेच सोशल मीडिया द्वारे आवाहनही करण्यात आले होते. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागत नसताना बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या लगत असलेल्या झुडपात नारायण रहाणे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला.त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.