विरार : विरारच्या मनवेलपाडा तलावात पालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन देऊनही चालढकल करत असल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तलावाच्या समोर बाबासाहेब यांचा अर्धाकृती पुतळा उभारला आहे. या पुतळ्याला प्रशासन वारंवार तोडक कारवाई केली जाईल असे सांगत असल्यामुळे शिवसेना विरार उपशहर प्रमुखांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी भेट घेत त्या पुतळ्याला अधिकृत मान्यता देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असावा अशी भावना आंबेडकरी समाजाची होती. विरार पूर्वेला असलेल्या मनवेलपाडा तलावात बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी २०१८ पासून पालिकेकडे होती. वसई -विरार महापालिकेने पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता न करता केवळ तलावाचे सुभोभिकरण करण्यात आले. यामुळे जुलै महिन्यात विविध पक्ष आणि संघटनेतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तलावासमोरील चौकात बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा उभारला.
जो पर्यंत तलावात पुतळा उभारला जात नाही तो पर्यंत नाक्यावरील अर्धाकृती पुतळा हटवला जाणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
जुलै महिन्यात पालघर जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. कायदेशीर बाबी तपासून मनवेलपाडा तलावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले होते. मात्र अद्याप हा पुतळा उभारण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नव्हता, असा आरोप आंबेडकरी कार्यकर्ते यांच्याकडून केला जात आहे.
अनेक वर्षांपासून मनवेलपाडा तलावात पालिका प्रशासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यावर टाळाटाळ करत आहे. यामुळे सामाजिक न्यायमंत्री यांना स्वतः भेटून निवेदन दिले आहे. जोपर्यंत बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जात नाही, तोपर्यंत अर्धाकृती पुतळ्याला अधिकृत मान्यता देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना विरार उपशहर प्रमुख प्रवीण जाधव यांनी केली आहे.