भाईंदर : मिरा -भाईंदर महापालिकेच्या विविध विभागामध्ये प्रशासकीय कामकाज करण्यासाठी कनिष्ठ अभियंता पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून मे. देवमामलेदार स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या ठेकेदाराला ठेका देण्यात आला होता. ठेकेदाराने अभियंत्यांना वेळेवर पगार न देणे तसेच महापालिकेने दिलेल्या अटी – शर्ती व नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ठेकेदाराला देण्यात आलेला ठेका रद्द करण्यात आला आहे. मिरा- भाईंदर महापालिकेच्या विविध विभागामध्ये प्रशासकीय कामकाज करण्यासाठी ठेका पध्दतीने कनिष्ठ अभियंता पुरवठा करण्यासाठी ८ नोव्हेंबर २०२१ रोजी मे. देवमामलेदार स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या ठेकेदाराबरोबर करारनामा करण्यात आला होता. त्यानंतर १ डिसेंबर २०२१ रोजी एकूण ४९ ठेका कनिष्ठ अभियंता पुरवठा करण्याबाबत कार्यादेश देण्यात आला होता.
या ठेकेदाराला ठाण्यातील एका राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून ठेका देण्यात आला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळेच ठेक्याची मुदत संपुष्टात येऊनही प्रशासनाकडून संस्थेला परस्पर सुधारीत कार्यादेश देण्यात आला तसेच तब्बल दोन वेळा मुदतवाढ देण्यात आल्याचे समोर आले आहे. हा ठेका मिळाल्यानंतर संस्थेने नियुक्त केल्या जाणार्या प्रत्येक कनिष्ठ अभियंत्यांकडून बेकायदेशीरपणे सुमारे २ ते ३ लाख रुपये उकळल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये महापालिकेने ठेकेदाराला अटी शर्तीचे पालन करण्याबाबत सांगण्यात आले होते. तरी देखील ठेकेदाराने कर्मचार्यांना वेळच्या वेळी वेतन न देता दोन – तिन महिने वेतन उशीराने दिले आहे,अशी तक्रार आहे. तसेच वेतन कंत्राटी अभियंत्यांना किमान वेतन कायद्यातील तरतुदीपेक्षा कमी वेतन अदा केले आहे. ठेका कनिष्ठ अभियंत्यांना वेतन प्रदान केल्यानंतर ठेकेदार प्रत्येकाकडून ५००० हजार रुपये परत घेत असल्याचे आढळून आले. याबाबत ठेकेदाराला तोंडी आणि अनेक वेळा नोटीसा देऊन बजाविण्यात आले होते. तरी देखील ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले. ठेकेदाराने करारनाम्यातील अटी शर्तीचा भंग केल्यामुळे ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला आहे.