भाईंदर : मिरा -भाईंदर महापालिकेत संगणक परिचालक आणि लिपिकांचा पुरवठा करण्याचा ठेका एका ठेकेदाराला २०२२ मध्ये देण्यात आला होता. ठेकेदाराबरोबर केलेल्या करारनाम्यात नियम व अटी शर्तीचा भंग केल्यास ठेका रद्द करून काळ्या यादीत टाकण्यात येईल असे नमूद आहे. असे असताना देखील ठेकेदाराने कर्मचार्यांना वेळेवर वेतन न देणे व किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत नसल्याचे आढळून आल्याने महापालिकेला ११९ संगणक चालक आणि लिपिकांचा पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आलेल्या ठेकेदार मे. शार्प सर्व्हिसेस’ यांचा ठेका रद्द केला आहे. महापालिकेने काही दिवसापूर्वी नियमांचे उल्लंघन करणार्या इंजिनिअर पुरवठा करणार्या कंपनीचा ठेका रद्द केला होता. तर पालिका आयुक्तांनी आदेश देऊनही वाहन विभागात वाहन चालकांना मागच्या दोन -तीन महिन्यांपासून पगार दिला नाही त्यांचाही ठेका रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
मिरा -भाईंदर महापालिकेला कर्मचार्यांची तीव्र कमतरता भासत असून, त्यातील जवळपास निम्मी मंजूर पदे रिक्त आहेत. या कमतरतेमुळे प्रशासकीय कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे आणि विद्यमान कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढत आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांना सेवा पुरवण्यास व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास महापालिकेला अडचणी निर्माण होत आहेत. पालिकेत आकृतीबंधानुसार कर्मचार्यांची संख्या कमी आहे. कर्मचार्यांची कमतरता भरून काढण्यासाठी महापालिकेकडून ठेका पध्दतीने कर्मचार्यांचा पुरवठा करण्यासाठी खासगी ठेकेदाराला ठेका देण्यात येत आहे. महापालिकेच्या जवळपास सर्वच विभागात कर्मचार्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे अनेक विभागात कर्मचार्यांचा पुरवठा करण्यासाठी ठेकेदाराला ठेके देण्यात आले आहेत.
पालिकेच्या विविध विभागांत ठेका पध्दतीने ११९ संगणक चालक तथा लिपीक व लघुलेखक मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी २०२२ रोजी ३ वर्षासाठी करारनामा करून कार्यादेश देण्यात आलेला आहे. करारनाम्यात कामाचा महिना संपताच कर्मचार्यांच्या वेतनाची मागणी महानगरपालिकेस सादर करावी व ठेकेदाराने प्रत्येक महिन्यास कामगारांना वेळच्या वेळी किमान वेतन कायद्यानुसार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आतमध्ये वेतन अदा करणे बंधनकारक आहे. असे असताना ठेकेदाराने कर्मचार्यांना वेळेवर वेतन दिले नाही व दिलेले वेतन किमान वेतन कायद्यानुसार कमी दिल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत ठेकेदाराला महापालिकेने अनेक वेळा नोटिसा देवुन देखील कोणतीही सुधारणा न करता महापालिकेचे आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे महापालिकेने ठेकेदाराबरोबर केलेला करारनामा रद्द केला आहे. तसेच मनपाकडे जमा असलेली ठेकेदाराची सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. ठेका रद्द केला असल्यामुळे ठेकेदाराने १३ फेब्रुवारी २०२५ पासुन संगणक चालक तथा लिपीक कर्मचारी यांचा पुरवठा महापालिकेस करु नये असे आदेश मुख्यालयाच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी काढले आहेत.
मिरा- भाईंदर महापालिकेतील वाहन विभाग आणि अग्निशमन विभागात चालक पदावर नेमण्यात आलेल्या ठेकेदाराने कर्मचार्यांना दोन – तीन महिन्यांपासून वेतन दिले नसल्याचे ड्रायव्हरकडून सांगितले जात आहे. या ठेकेदाराकडून देखील पालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याची चर्चा सुरु आहे. या कर्मचार्यांना लवकरात लवकर वेतन मिळावे व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून ठेका रद्द करण्याची मागणी केली जात आहे.