Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरडीएफसी मार्ग फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता

डीएफसी मार्ग फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता

Subscribe

पालघर येथे अतिरिक्त सायडींग रेल्वे लाईन टाकण्याची गरज भासल्याने नवली फाटकावरील रेल्वे उड्डाणपुलाची रचना बदलण्यात आली.

पालघर : दिल्ली ते संजाण (गुजरात) दरम्यान कार्यरत असणार्‍या समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग (डीएफसी) सफाळ्यापर्यंत कार्यरत होण्यासाठी असणारा नवली (पालघर) व सफाळे रेल्वे फाटकांचा अडथळा आठवडाभरात दूर होणार असून डीएफसी मार्ग पालघर जिल्ह्यात फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावरून दररोज प्रत्येक दिशेला २० मालगाड्या किमान धावण्याची शक्यता आहे. यामुळे उपनगरीय क्षेत्रातील मालगाड्यांचे प्रमाण कमी होणार असून आगामी काळात उपनगरीय सेवा वाढवण्यासाठी वाव राहणार आहे. पालघर व सफाळे ग्रामस्थांनी उड्डाणपूल कार्यरत न झाल्याने फाटक बंद करण्याला विरोध दर्शवला होता. पालघर येथे अतिरिक्त सायडींग रेल्वे लाईन टाकण्याची गरज भासल्याने नवली फाटकावरील रेल्वे उड्डाणपुलाची रचना बदलण्यात आली.

त्यामुळे या फाटकांमधून होणार्‍या प्रवासी वाहतूकला सोईस्कर पर्याय नसल्याने नागरिकांनी विरोध केला होता. तर सफाळा येथे फक्त एक पादचारी पूल असल्याने अतिरिक्त पुलांची मागणी करण्यात आली होती. नवली उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून सफाळे येथे दोन नवीन पादचारी पूल उभारण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे नागरिकांचे मत लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाने नवली व सफाळे फाटक बंद करण्यास ना हरकत दिली आहे. या अनुषंगाने सफाळे व नवली येथील फाटक बंद करण्यासाठी सात दिवसांची नोटीस देण्यात येणार असून १२ फेब्रुवारी नंतर ही दोन्ही फाटक बंद करून समर्पित मालवाहू मार्ग मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे सांगण्यात आले. सद्यस्थितीत सफाळा ते संजाण दरम्यान दोन्ही दिशेला प्रत्येकी २० मालगाड्या धावतील असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुख्य वाहिनीवरील भार कमी होणार आहे.


Edited By Roshan Chinchwalkar