Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरईद -उल- फित्रची आतुरता शिगेला

ईद -उल- फित्रची आतुरता शिगेला

Subscribe

रेडिमेड कपड्यांना सुद्धा चांगली मागणी आहे, त्यामुळे शहरातील सर्व परिसरात रमजान ईदची आतुरता शिगेला पोहोचली आहे.

जव्हार: मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे शेवटचे पर्व सुरु आहे. येत्या दोन दिवसांत चंद्र दर्शनानंतर संपूर्ण विश्वात ईद साजरी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने रमजान ईदच्या तयारीला सध्या कमालीचा वेग आला आहे. घराघरातून ईदची तयारी सुरू आहे. या निमित्ताने जव्हार शहरातील बाजारपेठेतही गर्दी दिसून येत आहे. नवीन कपडे व इतर साहित्याच्या खरेदीसाठी मुस्लीम बंधू-भगिनी शहरातील दुकानातून गर्दी करताना दिसत आहेत. रेडिमेड कपड्यांना सुद्धा चांगली मागणी आहे, त्यामुळे शहरातील सर्व परिसरात रमजान ईदची आतुरता शिगेला पोहोचली आहे.

रमजान ईदनिमित्त केला जाणारा शिरखुर्मा तयार करण्यासाठी खजूर, खोबरे, चारोळी, किसमिस, पिस्ते, काजू, अक्रोड, बादाम इत्यादी सुकामेवा खरेदीसाठी दुकानांवर ग्राहकांची रिघ लागली आहे. सुकामेवाचे पदार्थ खरेदी करून घराघरातून शिरखुर्मा तयार करण्यासाठी महिला भगिनी आता रात्री देखील जागत आहेत. ईद निमित्ताने सर्व जव्हारकर व आसपासच्या खेडोपाडी राहणारे नागरिक सकाळी ८.३० वा. इदगाह जव्हार याठिकाणी एकत्रितपणे नमाज पठण करणार असून त्याची साफसफाई, रंगरंगोटी देखील आता सुरू आहे. दुकानांबरोबरच घरोघरी जाऊन कपडे, बेडशीट, चादर, पडदे विकणारे फिरते व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपला व्यापार करीत आहेत. यावर्षी खोबर्‍याचे भाव कमी असले, तरी खजूर, चारोळी, पिस्ते यांच्या भावात वाढ झाली आहे,अशी माहिती माय बाजार किराणाचे मालक हाजी रियाज मेमन यांनी दिली.