विरार : वसई- विरार शहरात असलेल्या स्मशानभूमी नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरू लागल्या आहेत. यातील बहुतांश स्मशानभूमींना चिमण्या नसल्याने मृतदेहाचे दहन करताना निघणारा धूर परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. हे रोखण्यासाठी आता पालिकेने प्रत्येक स्मशानभूमीत धूर शुध्दीकरण करणार्या चिमण्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे धुरातील विषारी घटक नष्ट होऊन धुराची समस्या कमी होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला.
वसई- विरार महापालिकेच्या एकूण ८८ स्मशानभूमी आहेत. त्यात पारंपरिक पध्दतीने मृतदेहांचे दहन केले जाते. पारंपरिक पद्धतीने स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याने पर्यावरणाचा र्हास होतो. शिवाय प्रदूषण होत असते. एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी साधारण साडेचारशे ते पाचशे किलो लाकडे लागतात. त्यामुळे धूराचे प्रदूषण होत असते. स्मशानातील धूर हा हवेबरोबर इतरत्र पसरत राहतो आणि आसपासच्या इमारतीत राहणार्या नागरिकांच्या घरात जातो. येणार्या धुरामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या धुराचे लोट इमारतीत सातत्याने येत असल्याने अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश स्मशानभूमीत चिमण्या बसवेलल्या नाहीत. त्यामुळे धुराची समस्या अधिक तीव्र झाली आहे. चिमण्या नसल्याने त्रस्त नागरिकांना महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत.
धूर शुध्दीकरण यंत्रणा बसविणार
वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वसई- विरार पालिकेने यामुळे शहरातील सर्व स्मशानभूमींचे सर्वेक्षण केले होते. ज्या स्मशानभूमीत चिमण्या नाहीत, तेेथे चिमण्या बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरी देखील धुराची समस्या कायम राहण्याची शक्यता होती. यासाठी आता पालिकेने चिमण्यांसोबत धूर शुध्दीकरण यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेने असाप्रकारच्या चिमण्या बसविल्या आहेत. या चिमण्या २०० फूट उंच असतील. याशिवाय त्यात धूर शोषून त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा असेल. त्यामुळे धुरातील घातक घटक नष्ट होऊन तो धूर बाहेर पडेल, असे उपायुक्त समीर भूमकर यांनी सांगितले.