भाईंदर : मिरा- भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात तीन वर्षांचे एकत्रित कंत्राट मे. सेक्युअर -१ सिक्युरिटी सर्व्हिसेस या ठेकेदाराला देताना १२७ वाहन चालक पुरवठा करण्याच्या कामात घोटाळा करत फक्त ४० ते ५० ड्रायव्हर कामावर ठेवून बाकी ड्रायव्हरांचा पगार थेट घशात घालून भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार शिवसेनेच्या(शिंदे) युवा सेनेचे पदाधिकारी पवन घरत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. तर यात घोटाळा करणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून कंत्राट रद्द करून घोटाळा केलेली रक्कम पुन्हा पालिका तिजोरीत जमा करण्याची मागणी केली जात आहे.मिरा- भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत असतात. त्यातच अग्निशमन कर्मचारी कमी असल्याने पालिकेने ठेकेदारांच्या मार्फत नागरिकांना तातडीने सुविधा देण्यासाठी अग्निशमन विभागाच्या वाहनांवर ड्रायव्हर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
महासभेच्या मंजुरीनंतर अग्निशमन विभागाला १२७ चालकांच्या पुरवठ्यासाठी तीन वर्षांचे कंत्राट देण्यात आला होता. ही जबाबदारी मे. सेक्युअर – १ सिक्युरिटी सर्व्हिसेस नावाच्या कंपनीला देण्यात आलेली आहे. परंतु माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीवरून घरत यांना कळले की अग्निशमन विभागात १२७ चालकांऐवजी फक्त ४० ते ५० चालक कार्यरत आहेत. तर कंत्राटदार १२७ चालकांच्या नावे बोगस बिले सादर करून पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करत आहे. इतकेच नाही तर, कराराच्या अटींनुसार चालकांना ३ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक असूनही जड वाहने चालविण्याचा अनुभव असल्याने कंत्राटदार महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करत आहे,अशी तक्रारल आहे. पुरवलेल्या चालकांना आवश्यक असलेला अनुभव नसल्याचेही समोर आले आहे. याशिवाय, त्याच कंत्राटदाराला कंत्राट पद्धतीने १०० अग्निशमन कर्मचार्यांच्या पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ज्यामध्ये काही चालक अग्निशमन दलाचे काम करत आहेत आणि त्यांना दुप्पट पगार मिळत आहे.
युवा विधानसभा अधिकारी पवन घरत यांनी या घोटाळ्याची लेखी तक्रार महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली आहे.तसेच कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि कंत्राटदाराशी संगनमत करून त्याला कोणतीही चौकशी न करता बिल देणार्या संबंधित अधिकार्यांना महापालिकेतून बडतर्फ करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या घोटाळ्याची चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी सतत करत आहेत, परंतु महापालिका प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही,असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात चालकांच्या पुरवठ्यासाठी बनावट बिले सादर करून कंत्राटदाराकडून महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे. या कंत्राटदाराशी आर्थिक संगनमत करून कोणतीही पडताळणी न करता बिल भरणार्या संबंधित अधिकार्यांवर आणि कंत्राटदारावर कारवाई करावी. पालिका आयुक्तांनी या घोटाळ्याची तात्काळ दखल घ्यावी आणि कारवाई करावी.
– पवन घरत ,पदाधिकारी,युवा सेना
सदरील काम वाहन विभागामार्फत चालत असून याबाबत आम्ही आता सर्व वाहन चालकांची वन क्लिक याद्वारे हजेरी घेत आहोत. तसेच कमी ड्रायव्हर दाखवून जास्त पगार घेतला आहे, हे तपासून नियमित कारवाई केली जाईल.
-अनिकेत मानोरकर,अतिरिक्त आयुक्त