भाईंदर :- भाईंदरच्या उत्तन चौक भागातील एकमेव मोठ्या खेळाच्या मैदानात हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. या कामाला ग्रामस्थांनी विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्या ठिकाणी गुरुवारी दुपारी भेट दिली. खेळाच्या मैदानात हेलिपॅड बनवण्यास आमदार सरनाईक यांनी विरोध केला असून जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. त्याचवेळी आमदार सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर येथील हेलिपॅडचे काम बंद करून ते काम आता रद्द करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
ठाणे जिल्हा हा महत्वाचा जिल्हा असल्याने जिल्ह्यातील महत्वाच्या भागात जवळपास ८ ठिकाणी हेलिपॅडचे काम करण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले होते. त्यानुसार भाईंदरच्या २ जागेची हेलिपॅडसाठी निवड करण्यात आली होती. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदानात काही दिवसांपूर्वी हेलिपॅड उभारण्यासाठी काम सुरू केले होते. त्याला खेळाडू व आसपासच्या नागरिकांनी विरोध केला, त्यामुळे ते काम बंद झाले. आता भाईंदर पश्चिमेला उत्तन चौक येथील खेळाच्या मैदानात हेलिपॅड उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केल्याने येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. नरवीर चिमाजी अप्पा स्मारकाजवळ असलेल्या या मैदानात खेळाचे आरक्षण आहे. चौक, पाली, उत्तन, डोंगरी, तारोडी या पंचक्रोशीतील हे एकमेव खेळाचे मैदान असून येथे विविध खेळ, क्रिकेट सामने होत असतात. या खेळाच्या मैदानात हेलिपॅड तयार करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याने नाराजी होती.
खेळाचे मैदान हे खेळासाठीच वापरले जावे. कोणत्याही परिस्थितीत हे खेळाचे मैदान सुरक्षित राहिले पाहिजे व खेळाचे मैदान मैदानच राहिले पाहिजे, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले होते. त्यानंतर उत्तन, चौक परिसरात शिवसेनेच्या वतीने ग्रामस्थांच्या सह्यांची मोहीम घेण्यात आली होती. त्यानंतर आमदार सरनाईक यांनी हेलिपॅड उभारण्याचे काम रद्द केले पाहिजे यासाठी स्थानिकांची भेट घेतली. यावेळी स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन सरनाईक यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून हे काम रद्द करण्याची मागणी केली. स्थानिकांचा जिल्हा प्रशासनाने हेलिपॅड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित हेलिपॅडचे काम डोंगरी येथील शासकीय जागेत करण्यात यावे अशी मागणी आमदार सरनाईक यांनी केली असता ती मागणी मान्य करण्यात आले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले आहे.