विरार : वसई -विरार शहर पालिकेच्या मुख्य जुन्या इमारतीच्या कार्यालयाच्या आवारात पालिकेच्या वाहतूक परिवहन विभागाचे बस स्थानक आहे. या स्थानकातून विरार शहराच्या अनेक भागात शेकडो गाड्या ये-जा करत असतात. मात्र या बसगाड्या पकडण्यासाठी प्रवाश्यांना भर उन्हात रांगेमध्ये उभे राहून बस येण्याची वाट पहावी लागते. यामुळे प्रवाश्यांना बस स्थानकाच्या ठिकाणी छप्पर लाऊन द्यावे, अशी मागणी प्रवाशी नागरिकांनी केली आहे.
विरार शहरात वसई -विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाची परिवहन सेवा सुरू आहे. ही सेवा वीर सावरकर मार्ग, मनवेलपाडा रोड, कारगिल नगर, जीवदानी रोड, विरार फाटा, फुलपाडा रोड, अशा ठिकाणी चालू आहे. या परिवहन सेवेचे बस स्थानक महानगरपालिकेच्या जुन्या मुख्य कार्यालयाच्या आवारात आहे. या ठिकाणाहून हजारो नागरिक दिवसाला प्रवास करत असतात. मात्र, पालिकेच्या बाजूला असलेल्या बस स्थानकांत प्रवाश्यांना उभे राहण्याची सोय नसल्याने प्रवाश्यांनी पालिकेच्या परिवहन विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक दिवसांपासून शहरात उष्णतेच्या झळ तीव्र भासू लागल्या आहेत. त्यातच बस स्थानकात बस पकडण्याच्या ठिकाणी छप्पर नसल्यामुळे प्रवाश्यांना भर उन्हात उभे राहून पालिकेच्या बसेसची वाट बघावी लागते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, शाळेतील शाळकरी, चाकरमानी यांचा समावेश आहे. यामुळे त्याठिकाणी प्रवाश्यांना चक्कर येऊन पडणे असे प्रकार होत असतात, अशी माहिती प्रवाशी नागरिक सुनील कांबळे यांनी दिली.
पत्र्याच्या बाजूने छप्पर लावल्यावर सावली येईल, असे करणे गरजेचे आहे. अन्यथा उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघाताने प्रवाशाचा मृत्यू होऊ शकतो.
– मेहुल मोने , स्थानिक नागरिक