Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईपालघरVasai City: माकुहरी शहराच्या धर्तीवर वसईजवळ नवे शहर

Vasai City: माकुहरी शहराच्या धर्तीवर वसईजवळ नवे शहर

Subscribe

या समितीत वसई-विरार महापलिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांचाही समावेश आहे. अधिकाधिक प्रवाशांनी बुलेट ट्रेनचा वापर करावा यासाठी येथे मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) धर्तीवर बीजीसी (बसीन ग्रोथ सेंटर) तयार केला जाणार आहे.

वसई : जपानमधील माकुहरी शहराच्या धर्तीवर आता वसईजवळ नवे शहर उभे राहणार आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील वसईतील स्थानकाजवळ व्यापारी केंद्राबरोबरच हे शहर विकसित केले जाणार आहे. त्यासाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी जपानची जायका कंपनी अर्थसाहाय्य करणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या (बुलेट ट्रेन) राज्यातील चार स्थानकांपैकी एक असलेले विरार स्थानक नालासोपारा पूर्वेच्या वालईपाडा येथे तयार केले जाणार आहे. या स्थानक परिसराचा विकास करण्यासाठी ‘प्रोजेक्ट स्मार्ट’ हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने विशेष समिती स्थापन केली आहे.

या समितीत वसई-विरार महापलिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांचाही समावेश आहे. अधिकाधिक प्रवाशांनी बुलेट ट्रेनचा वापर करावा यासाठी येथे मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) धर्तीवर बीजीसी (बसीन ग्रोथ सेंटर) तयार केला जाणार आहे. या व्यापारी केंद्राचा विकास करताना येथील साडेचारशे हेक्टर जागेवर जपानच्या धर्तीवर नवे शहर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जपानच्या माकुहरी शहराचे ‘रोल मॉडेल’ ठरविण्यात आले आहे. या शहराचा अभ्यास करण्यासाठी वाय. एस. रेड्डी यांनी नुकताच जपान देशाचा अभ्यास दौरा केला. या प्रकल्पामध्ये व्यापार केंद्रे (बिझनेस हब), मनोरंजनाचे क्षेत्रे (अम्युजमेंट पार्क) उभारण्यात येणार आहेत.जपानमधील माकुहारी शहराची रचना ज्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणेच शहर विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माकुहारी शहराची संकल्पना ब्लू, ग्रीन नेटवर्कवर आधारित आहे. त्यात पावसाळ्यात जलनियोजन आणि अन्य मोसमात हिरवाई यांचे मिश्रण करण्यात आले आहे. त्यानुसार या शहराची रचना केली जाणार आहे. या परिसरात असलेल्या वनजमीन आणि महसुलाच्या जागेवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आणि चाळी तयार झाल्या आहेत. त्यांचा विकास करण्यासाठी चार समूह पुनर्विकास योजना राबविल्या जाणार आहेत.


Edited By Roshan Chinchwalkar