भाईंदर : राज्यात मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोगातर्फे वेळोवेळी ऑनलाईन मतदार नोंदणीचे आवाहन केले जाते. हेतू चांगला असला तरी कागदपत्रांची पडताळणी घरोघरी जाऊन वा सरकारी कार्यालयात बोलावून केली जात नाही. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस मतदार नोंदणीही होऊ शकते. ऑनलाईन मतदार नोंदणी काटेकोरपणे होण्यासाठी आणि बोगस मतदान होऊ नये यासाठी कागदपत्रांची तपासणी घरोघरी जाऊन करण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी तथा जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर मिरा -भाईंदर विधानसभा मतदार संघात तब्बल ६८ हजार नव्याने मतदार नोंदणी झाली होती, हा आकडाच आश्चर्य जनक आहे. राज्यातील बहुतांश मतदार संघात अशी वाढ झाली, त्यामुळे राज्यातील निवडणूक निकाल अनपेक्षित लागला. याचे महत्वाचे कारण प्रत्यक्ष तपासणी न करता केवळ ऑनलाईनच्या आधारावर त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला.
ऑनलाईन मतदाराची नोंद मतदार संघातील कोणत्याही यादीमध्ये होते. मतदाराचा पत्ता आधार कार्डनुसार असूनही त्याचे नाव कोणत्याही यादीत टाकले जाते. त्यामुळे मतदारास शोधणे कठीण जाते. पासपोर्ट नोंदणी सुद्धा ऑनलाईन होते, कागदपत्रांची तपासणी पोलीस स्टेशन करते, पोलीस अहवाल नंतरच पासपोर्ट कार्यालय पासपोर्ट वितरित करते. मतदार नोंदणी ऑनलाईन झाल्याने त्याच पद्धतीने त्याची तपासणी सुद्धा होणे आवश्यक असल्याचे प्रकाश नागणे म्हणाले. कारण तो मतदार प्रत्यक्ष कुणीही पाहिलेला नसतो, फक्त ऍड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड, लाईट बीलच्या आधारावर त्रयस्थ व्यक्ती मार्फत त्याची नोंदणी होत असल्यामुळे एक प्रकारे बोगस मतदार बनवला जाऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. निवडणूक आयोगाने यापुढे अशा ऑनलाईन मतदार नोंदणी करणार्या मतदारांच्या कागदपत्रांची पडताळणी घरोघरी जाऊन वा कार्यालयात बोलावून करण्याची आवश्यकता असून पडताळणी झाल्यानंतरच रजिस्टर्ड मोबाईल नंबर सह त्याची मतदार यादीमध्ये नोंदणी करावी, अशी मागणी प्रकाश नागणे यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना केली आहे.