विरार : तळा तालुका बौद्धजन सेवा संस्थेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विरारच्या जीवनदया ट्रस्ट वृद्धाश्रमला भेट देत फळांचे वाटप करण्यात आले. तसेच वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिकांसोबत केक कापून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था ही गरजूंना मदत करणारी संघटना आहे, असे संघटनेतील सदस्यांनी बोलताना सांगितले. ( Virar News: Buddhist Service Organization visits Jeevandaya Trust old age home )
तसेच संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजूंसाठी आर्थिक, मानसिक, शैक्षणिक मदत केली जाते. संस्थेच्या माध्यमातून महाड येथे पूरग्रस्त नागरिकांना कडधान्य कपडे, चादरींचे वाटप करण्यात आले. तसेच विरार शहरात देखील सक्रिय संस्थेच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात दिला जात आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र माळी, सचिव उत्तम लोखंडे, आनंद माळी, अंकुश माळी, गीतेश शिंदे, अशोक गायकवाड, सुनील गायकवाड उपस्थित होते.