विरार : लग्नात शिरून वधूवराच्या दागिन्यांची चोरी करणार्या कुख्यात ‘कडीया सासी’ टोळीचा बोळींज पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विरारमधील एका लग्न सोहळ्यातील चोरीचा उलगडा करून पोलिसांनी टोळीतील एका आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक केली आहे. मध्यप्रदेशातील गुलखेडी गावात कुप्रसिध्द कडिया सासी टोळी आहे. लग्नात ते पाहुणे बनून जातात आणि गर्दीत फायदा घेत आहेरात आलेले पैसे, वधू वरांचे दागिने लंपास करतात. या चोरीच्या सापळ्यात ते लहान मुलाचा वापर करतात. लहान मुलगा विवाहस्थळाची रेकी करून दागिने आणि आहेराचे पैसे कुठे ठेवले त्याची माहिती काढत असतो. विरार मधील मिनल पाटील यांच्या मुलीच्या लग्नात फेब्रुवारी महिन्यात या टोळीने आहेराचे ८ लाख रोख आणि ३ तोळे दागिने लंपास केले होते. बोळींज पोलिसांनी मध्यप्रदेशच्या गुलखेडी हुलखेडी गावात तब्बल ११ दिवस राहून एका आरोपीला अटक केली आहे. या टोळीतील चार आरोपी आणि लहान मुले अद्याप फरार आहेत.( Virar News: Robbery at weddings with the help of children, gang finally exposed )
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३, सहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बोळींज पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि किरण वंजारी, पोउपनि विष्णु वाघमोडे, स. फौ. जनार्दन मते, पोहचा किशोर धनु, पो.अमं. संदिप शेळके, रोशन पुरकर, प्रफुल्ल सरगर, सुखराम गडाख, तांत्रिक मदत पोहवा नामदेव ढोणे पोअं सोहेल शेख नेम. परि ०३ विरार कार्यालय व एमएसएफ जवान सागर देशमुख यांनी केलेली आहे. लग्न समारंभात वधूवराच्या मिळणार्या मौल्यवान वस्तूंवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच त्या वस्तू आपल्या विश्वासू व्यक्तीकडे ठेवण्यास द्याव्या आणि समारंभाच्या वेळी मुख्य ठिकाणी लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे आवाहन जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ तीन यांनी केले आहे.