पालघर : वाडा तालुक्यातील लोहपे गावात वीट भट्टीवर मजुरीचे काम करणार्या ३५ वर्षीय महिलेवर वीट भट्टीवर काम करणार्याने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, ट्रॅक्टर माघारी आल्याने पीडिता जखमी झाली तर तिच्या आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात वाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, नातेवाईकांनी मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. वाडा पोलिसांकडून मुलीचे शव विच्छेदन मुंबईच्या सर जे जे रुग्णालयात करण्यात आले आहे. पोलीस अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत. वाडा तालुक्यातील लोहपेगावातील विटभट्टीवर ३५ वार्षिय पीडिता तिचा पती आणि आठ वर्षीय मुलीसोबत गेल्या तीन महिन्यांपासून काम करून वीट भट्टीच्या ठिकाणी भोंग्यावर राहत होते.
तक्रारूनुसार बुधवारी पीडितेच्या कुटुंबाने विटा थापण्याचे काम दुपारपर्यंत संपवले. त्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास वीटभट्टी मालकाने त्यांना खर्चासाठी एक हजार रुपये दिले. गावात जाऊन तीन वाजण्याच्या सुमारास वीटभट्टीवर परतले. त्यावेळी त्यांना ट्रॅक्टरमध्ये विटा भरण्यासाठी बोलावले.त्यावेळी विटभट्टीवर काम करणारे मजूर, ट्रॅक्टर ड्रायव्हर होते. टॅक्टरमध्ये विटा भरल्यानंतर पीडितेचे कुटुंब आणि तिघे जण ट्रॅक्टरमध्ये बसून बंदारपाडाला गेले. तेथे मजूर ट्रॅक्टरवरून विटा उतरविण्याचे काम करीत होते. परंतु एक मजूर कुठेतरी निघून गेला होता. पीडिता आणि तिची मुलगी झाडाखाली बांधावर बसल्या होत्या. संध्याकाळी सात ७.३० वाजता ट्रॅक्टरमधील अर्ध्या विटा खाली केल्यानंतर पीडितेचा पती आणि मजूर प्यायला गेले. त्यावेळी पीडितेच्या इच्छे विरोधात सखाराम नावाच्या मजूराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.अत्याचार सुरु असताना तिची मुलगी घाबरून ट्रॅक्टरजवळ गेली तसेच पीडिता ओरडू लागल्याने सखाराम पळून गेला. थोड्या वेळाने दारू प्यायला गेलेले चौघे जण परत आले. पीडिता आणि तिची मुलगी ट्रॅक्टरजवळ उभी होती. त्यावेळी ट्रॅक्टर ड्रायव्हरने ट्रॅक्टर पुढे नेला. परंतु ट्रॅक्टर पुढे न जाता ट्रॅक्टर मागे आल्याने ट्रॅक्टरचा धक्का बसून पीडिता खाली पडली. त्यावेळी तिची मुलगी पतीच्या हातात होती. दोघींना उचलून ट्रॅक्टरमध्ये टाकून भट्टीवर घेऊन गेले. वीट भट्टीवर पोहोचल्यानंतर वीट भट्टी मालक पीडिता आणि तिच्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यात जात असताना वीटभट्टी मालकाने ट्रॅक्टरचालकाचे नाव घेवू नको टेम्पोने उडवले असे सांग, असे सांगितले. दवाखान्यात पोहचल्यानंतर मुलीची हालचाल बंद झाली. डॉक्टरांनी मुलीला तपासल्यानंतर मयत घोषीत केले.