पालघर: पालघर येथील शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील कॅनबारा इंडस्ट्रीज कंपनीत मंगळवारी १९ डिसेंबर रोजी लिफ्ट अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सामान उतरवताना लिफ्टची वायर तुटून हा अपघात घडला आहे. सिकंदर मखंचू राजभर असे 25 वर्षीय मृत कामगाराचे नाव आहे. पालघरच्या शिरगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये कॅनबारा इंडस्ट्रीज ही कंपनी असून या कंपनीमध्ये थंड हवेचे कुलर उत्पादन केले जातात. उत्पादन सुरू असताना कंपनीच्या मोटार विभागांमध्ये काम करणारा सिकंदर राजभर हा लिफ्टमधून सामान खाली आणत होता.
संध्याकाळी पाचच्या दरम्यान लिफ्टची वायर अचानक तुटली. त्यामुळे लिफ्ट जोरात आदळली. या घटनेत राजभर याला जोरदार मार लागला व त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर सहकारी कामगारांनी व कंपनी व्यवस्थापनाने त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पालघर ग्रामीण रुग्णालयामध्ये पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्यांकडून पंचनामा व इतर कार्यवाही केल्यानंतर मृत कामगाराचा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. कंपनीने सुरक्षेत हलगर्जीपणा केल्यामुळे लिफ्टचा अपघात घडल्याचे आरोप या कामगाराच्या सहकारी कामगारांनी म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही लिफ्ट नादुरुस्त होती.