वसई : मित्राच्या वाढदिवसासाठी जात असलेल्या एका तरुणाची क्षुल्लक वादातून हत्या झाल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. सौरव मिश्रा (२५) असे या मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या दुचाकीचा धक्का लागल्याने त्याला ५ जणांनी मारहाण केली होती. जखमी सौरभला ४ रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिला होता. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. सौरव मिश्रा (२५) हा तरुण नालासोपारा पूर्वेच्या शेरा सर्कल येथील विनी हाईट इमारतीत राहतो. सोमवारी त्याचा मित्र विवेक गुप्ता याचा वाढदिवस होता. मध्यरात्री १२ वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्याची योजना त्याच्या मित्रांनी बनवली होती. त्यानुसार रात्री साडे आठ वाजता सचिन शर्मा (२४) विवेक गुप्ता (२०) सोनू खान उर्फ कॅफी (२५) आणि सौरभ मिश्रा एकत्र भेटले.
त्यांचा एक मित्र संतोष भुवन येथे राहतो. त्यांना घेण्यासाठी हे चौघे जण दोन दुचाकीवरून जाण्यासाठी निघाले. त्यावेळी संतोषभुवनच्या मोची पाडा येथे अजय चौहान (२०) आणि कौशिक चौहान (२१) हे दोघे भाऊ बसले होते. सौरभच्या गाडीचा धक्का त्यांना लागला. त्यावरून चौहान बंधूंनी सौरभला शिविगाळ केली आणि शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर चौहान बंधूनी सौरभ आणि विवेक यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. ते पाहून चौहान याचे आई वडिल आणि त्यांचा एक मित्र सुनिल सोनावणे त्या ठिकाणी आला. त्यांनी देखील या दोघांना मारहाण केली. सौरभच्या मित्रांनी मध्यस्ती करून कसेबसे भांडण मिटवले. त्यानंतर सौरभ आपल्या दुचाकीवरून जाण्यासाठी निघाला होता. मात्र अचानक कौशिक चौहान हा घरातून लोखंडी सळई घेऊन आला आणि त्याने सौरभच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे सौरभ रक्तबंबाळ होऊन खाली पडला. मध्यरात्री २ च्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Edited By Roshan Chinchwalkar