मुंबई – कुर्ला भागात बेस्टने अनेकांना चिरडल्याची घटना अजून लोक विसरलेले नाहीत, तोच प्रभादेवी येथे एसटी महामंडळाच्या (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ – एमएसआरटीसी) शिवनेरी बसने तीन तरुणांना धडक दिली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले. बुधवार-गुरुवारच्या रात्री 2.30 वाजता प्रभादेवी पुलावर हा अपघात झाला. शिवनेरी बस चुकीच्या दिशेने भरधाव येत होती असे सांगण्यात येत आहे.
प्रणय बोडके राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सोशल मीडिया विभागात होता
आज होळीचा सण आहे. होळीच्या पूजेसाठी फुलांची खरेदी करायला तिघे तरुण निघाले होते. प्रणय बोडके , करण शिंदे आणि दुर्वेश गोरडे हे तिघे ट्रिपलसीट दुचाकीवरुन दादार फुल बाजारात जात होते. प्रभादेवी पुलावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव शिवनेरी बसने तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. स्थानिकांनी त्वरीत तिन्ही जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान प्रणय बोडकेचा मृत्यु झाला आहे. तो 29 वर्षांचा होता. करण आणि दुर्वेश हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

प्रभादेवी पुलावर चुकीच्या दिशेने बस चालवणारा चालक इक्बाल शेख याला अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर स्थानिकांनी शिवनेरीच्या चालकाला पकडून दिले. प्रणय बोडके हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया विभागात काम करत होता. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी आणि दीड वर्षांचा मुलगा असे कुटुंब आहे. बोडके कुटुंबात प्रणय हा एकटाच कमावता होता. त्याचे कुटुंब काळाचौकी येथील एक्य दर्शन सोसायटीमध्ये राहते. होळीच्याच दिवशी झालेल्या प्रणयच्या मृत्यूने परिसरता शोककळा पसरली आहे.