Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईPravin Darekar : दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करू नका, दरेकरांचा राज ठाकरेंना सल्ला

Pravin Darekar : दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करू नका, दरेकरांचा राज ठाकरेंना सल्ला

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 व्या वर्धापन दिन सोहळ्यात भाषण करताना महाकुंभमेळा आणि गंगा नदीतील पाण्याबाबत थेट विधान केले. त्यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 व्या वर्धापन दिन सोहळ्यात भाषण करताना महाकुंभमेळा आणि गंगा नदीतील पाण्याबाबत थेट विधान केले. त्यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर माणसं-बाया अंग घासून अंघोळ करत आहेत आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत. मला सांगा कोण पिणार ते पाणी, असे विधान राज ठाकरेंनी केले. त्यांच्या या विधानावर भाजपा नेतेमंडळी आक्रमक झाली. भाजपा नेत्यांकडून याबाबतच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली असतानाच नेते प्रवीण दरेकर यांनी दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करू नका, असा सल्ला राज ठाकरेंना दिला आहे. (Pravin Darekar criticizes Raj Thackeray statement on Mahakumbh Mela and water in Ganga river)

भाजपा नेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत म्हटले की, त्यांचे हे वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारे आहे. हिंदू माणूस देव देवतांवर श्रद्धा ठेवणारा आहे, म्हणून दगडालाही श्रद्धाळू देव मानतो. त्यामुळे हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान आहे. दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला कोणीही दिलेला नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करू नये. स्वच्छतेच्या मुद्द्यावर आम्हीही सहमत आहोत. राजीव गांधींपासून ते आजपर्यंत नद्या स्वच्छ झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, याचे सर्वस्वी खापर आतापर्यंत सत्ता भोगलेल्या काँग्रेसवरच फोडले गेले पाहिजे. कारण भाजपा आणि महायुती ही अलिकडेच, काही वर्षांपासून सत्तेत आली आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याला प्राधान्य दिले आहे. नदी जोड प्रकल्प असेल, जगबुडी नदीची स्वच्छता मोहीम, सिंचन गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, असे अभिनव उपक्रम त्यांनी आणल्याची माहिती यावेळी दरेकरांनी दिली.

हेही वाचा… Raj Thackeray : हड् मी ते पाणी पिणार नाही…; गंगेतील पाण्याबाबत राज ठाकरे काय बोलून गेले?

तर, प्रदुषण होऊ नये, म्हणून हे सरकार उपाययोजना करत आहे. मिठी नदी 25-30 वर्षांच्या काळात ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांना स्वच्छ करणे जमलेली नाही. ते आता गतीने होत आहे. त्यामुळे आता स्वच्छतेच्या बाबतीत, प्रदूषण मुक्त होण्याच्याबाबतीत प्रचंड काम होत आहे. मुंबई डीप क्लिनींगचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रदूषणावर आळा बसत आहे. प्रदूषण होऊ नये म्हणून हे सरकार काम करत आहे. स्वच्छता आणि प्रदूषणमुक्तीबाबत प्रचंड काम सुरू आहे. चांगल्या गोष्टींचे कौतुक करायला हवे. कुंभमेळा ही शेकडो हजारो वर्षांची परंपरा आहे. आपण श्रद्धेवर जगत आहोत, असेही दरेकर म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे?

मनसेच्या 19 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, चिंचवडमधील मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्याबाबत म्हणाले की, मध्यंतरी मुंबईत आमच्या पदाधिकाऱ्यांची मेळावा बैठक लावली होती. त्यात काही शाखेचे पदाधिकारी गैरहजर होते आणि जे गैरहजर होते त्यांची हजेरी मी घेतली. त्यावेळी प्रत्येकाला विचारले असता त्यातल्या अनेकांनी आपली आपली कारणे दिली. त्यातल्या बहुतांश लोकांनी कुंभमेळ्याचे कारण पुढे केले. त्यामुळे मुळात तुम्ही पाप करताच कशाला? असा प्रश्न मी त्यांना केला. शिवाय परत आल्यावर अंघोळ केली का असेही विचारले. बाळा नांदगावकर ही कमंडलुमधून पाणी घेऊन आले. मी त्यांना म्हटले हड् मी ते पाणी पिणार नाहीये. सोशल मीडियावर माणसं-बाया अंग घासून अंघोळ करत आहेत आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत. मला सांगा कोण पिणार ते पाणी, असे विधान राज ठाकरेंनी केले.