Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईPune Crime : ...तर सर्वसामान्य जनतेचे काय? देवेंद्र जोग मारहाणप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सरकारला प्रश्न

Pune Crime : …तर सर्वसामान्य जनतेचे काय? देवेंद्र जोग मारहाणप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सरकारला प्रश्न

Subscribe

गेले‌ काही दिवस पुण्यात गुंडांनी उच्छाद मांडला आहे.‌ भररस्त्यतात रिव्हॉल्व्हर काढणे, हाणामारी करणे असे प्रकार नेहमीच घडताना दिसत आहेत.

(Pune Crime) पुणे : क्षुल्लक कारणावरून कुख्यात गुंड गजा मारणे याच्या गुंडांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली आहे. चौथा आरोपी फरार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP SP) खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्रीमहोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आता उपस्थित झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Supriya Sule’s question to the government in Devendra Jog beating case)

शिवजयंतीनिमित्त कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीजवळून केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडिया सांभाळणारा देवेंद्र जोग मोटारसायकलवरून जात होता. त्यावेळी दुसऱ्या दुचाकींवरील चौघांनी देवेंद्र जोगच्या गाडीला कट मारला. हे चौघेही मारणेच्या टोळीतील होते आणि देवेंद्र जोगने रागाने बघितले म्हणून त्यांनी वाद घातला. ‘गाडी हळू चालवत येत नाही का? धक्का का दिला?’ असे म्हणत एका गुंडाने देवेंद्रच्या नाकावर जोरदार फटका मारली. त्यानंतर देवेंद्रला रस्त्यावर पाडून लाथा-बुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली. मारहाणीनंतर टोळक्याने तेथून पळ काढला.

हेही वाचा – Sharad Pawar : 1991मध्ये पंतप्रधानपदासाठी नाव शॉर्टलिस्ट झाले, पण…; शरद पवारांनी केला खुलासा

देवेंद्रने नंतर वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. दोघांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ आणि बाबू पवार (गजा मारणेचा भाचा) यांच्याविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बाबू पवार सोडून तिघे गजाआड आहेत.

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. पुणे शहरात केंद्रीय मंत्र्यांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नाहीत. कुख्यात गुंडाने पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केले. केंद्रीय मंत्री महोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

गेले‌ काही दिवस पुण्यात गुंडांनी उच्छाद मांडला आहे.‌ भररस्त्यतात रिव्हॉल्व्हर काढणे, हाणामारी करणे असे प्रकार नेहमीच घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात तातडीने लक्ष घालून शहराची कायदा-सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : मनात नसतानाही 1993ला महाराष्ट्रात यावे लागले, शरद पवार असे का म्हणाले?