रायगड – रायगड पालकमंत्रीपदाचा वाद शमलेला नाही. त्यातच रायगड दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर अजून तोडगा काढलेला नाही, हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट केले आहे. रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडचा पालकमंत्री कोण होणार, या प्रश्नावर म्हटले आहे. यामुळे रायगड पालकमंत्रीपदाचा घोळ अजूनही सुरुच आहे, अशा चर्चेला उधाण आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कारमध्ये एकनाथ शिंदे, आदिती तटकरे, भरत गोगावले
नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजून मिटलेला नाही. असे असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगड दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. रायगडकडे जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाड येथे थांबले. त्यांनी चवदार तळ्याला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पुढील कार्यक्रमासाठी जातांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या वाहनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्रीपदावर दावा करणारे मंत्री भरत गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांना सोबत घेतले.
शिंदे सेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा रायगड पालकमंत्रीपदावरील दावा कायम आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी चौघांसह एकत्र प्रवास केल्यामुळे या प्रवासात पालकमंत्रीपदावर तोडगा निघणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रायगड पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती फडणवीसांनी केली होती. त्याला शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी विरोध केला. गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्तारोकाचा प्रयत्न केला. रायगड पालकमंत्रीपदाला होत असलेला विरोध पाहता, दावोस दौऱ्यावर असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. रायगडसोबतच नाशिक जिल्हा पालकमंत्रीपदाबद्दलही वाद आहे. येथेही एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे.
आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी तटकरे, गोगावले आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत प्रवास करुन पालकमंत्रीपदावर तोडगा सांगितला असेल तो तोडगा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मान्य होईल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
नाशिकमध्ये महाजनांची बॅनरबाजी
भाजप नेते गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असल्याचे संकेत भाजपाच्या गोटातून समोर येत आहेत. तर आज मंत्री गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये लागलेले बॅनर चर्चेत आले आहे. हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री आशयाचे बॅनर शहरात लागले आहे. पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाही समर्थकांकडून बॅनरबाजी सुरू आहे.
हेही वाचा : Rohini Khadse : केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षीत नसेल तर…; महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खाते अपयशी