पनवेल : शिवसेनेतील नाराजीमुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 24 तासांत आली. असे असले तरी नाशिकमधून गिरीश महाजन आणि रायगडमधून आदिती तटकरे हेच 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण करणार आहेत. सरकारच्या या नव्या शासन निर्णयामुळे ध्वजारोहण कोण करणार, या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. दावोसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली होती. मात्र, रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप आमदारांचा विरोध असतानाही आदिती तटकरे यांना संधी मिळाल्याने शिवसेनेत संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगडसह नाशिक जिल्हा पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली.
हेही वाचा… Aaditya Thackeray : मुख्यमंत्री कोणासमोर झुकणार नाहीत असे वाटत होते पण, ठाकरेंची टीका
सरकारने शनिवारी (18 जानेवारी) रात्री पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात गिरीश महाजन यांना नाशिक तर आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याची जबाबदारी मिळाली होती. यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी सुरू झाली. शिवसेनेचे भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आदिती तटकरे यांच्या नियुक्तीने ते प्रचंड नाराज झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी लगेचच मुंबई गोवा महामार्गावर आंदोलन केले, टायर जाळून रास्ता रोको केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रायगडमधील गोगावले समर्थक 38 पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे शिवसेना पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले. तर खुद्द एकनाथ शिंदे नाराज होऊन ते सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावात गेले होते.

हेही वाचा… Jayant Patil : मंत्रीच जाळपोळ करण्यासाठी रस्त्यावर लोकं उतरवतात; जयंत पाटलांचा सरकारला टोला
या नाराजीचे पडसाद उमटल्यानंतर 24 तासांतच म्हणजे रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी नवा शासन निर्णय काढत जिल्ह्यात अनुक्रमे गिरीश महाजन, आदिती तटकरे हेच राष्ट्रध्वाजारोहण करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पालकमंत्री नसतानाही या दोघांना 26 जानेवारीला ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे.
(Edited by Avinash Chandane)