Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडAlibag News : चार दशकांनंतर ऑलिव्ह रिडले कासवांचे अलिबागमध्ये पुनरागमन, किहीम बीचवर अंडी

Alibag News : चार दशकांनंतर ऑलिव्ह रिडले कासवांचे अलिबागमध्ये पुनरागमन, किहीम बीचवर अंडी

Subscribe

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील किहीम समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्र कासवाने अंडी घातली आहेत. ही घटना दुर्मिळ असल्याने त्या अंड्यांचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे आवाहन कांदळवन दक्षिण कोकण विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. किहीमचे सरपंच प्रसाद गायकवाड यांनी सांगितले की, म्हात्रे आळी समुद्रकिनारी मंगळवारी दुपारी नितीन आणि अमय पाटील हे दोन पर्यटक फिरायला आले होते. त्यांना ऑलिव्ह रिडले कासव प्रजातीची मादी अंडी देताना दिसली. त्यांनी ही माहिती ग्रामपंचायतीला कळवली. त्यानंतर सरपंच गायकवाड यांच्यासह विभागीय वन अधिकारी (दक्षिण कोकण कांदळवन) कांचन पवार, सहाय्यक वनसंरक्षण प्रियंका पाटील, अलिबाग कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी पाहणी केली. ग्रामपंचायत आणि वन विभागाच्या कांदळवन कक्षाने या अंड्यांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी उपाययोजना आखल्या आहेत.

हेही वाचा…  Matheran Monkey News : माथेरानमधील आजारी माकडांवर उपचार होणार, आपलं महानगरच्या बातमीचा परिणाम

ऑलिव्ह रिडले समुद्र कासवाची मादी रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावर वाळूमध्ये खड्डा तयार करते. वाळूच्या खाली 100-150 च्या प्रमाणात अंडी देते. पुन्हा वाळूच्या साहाय्याने अंड्यावर वाळू टाकून मादी समुद्रामध्ये शिरते. अंडी वाळूच्या खड्ड्यांमध्ये स्वतःच उबतात. म्हणूनच या अंड्यांची काळजी घेणे गरजेचे असते. रात्री समुद्रकिनारी गस्त घालून या कालावधीमध्ये समुद्र कासवांनी तयार केलेली घरटी शोधून घरट्यांमध्ये घातलेली अंडी योग्य पध्दतीने खड्डा खोदून, हाताळून समुद्रकिनारी जाळीबंद हॅचरीमध्ये कृत्रिमरित्या वाळूमध्ये उबवण्यासाठी ठेवणे अतिशय गरजेचे असते. ऑलिव्ह रिडले दुर्मिळ समुद्र कासवाच्या संरक्षणासाठी चारही बाजूने जाळी लावून तेथे रखवालदार नियुक्त करण्यात आले आहेत.

आनंदोत्सव करणार

अंडी उबवण्यासाठी अंदाजे 50 दिवस लागतील. पिल्ले बाहेर निघण्याचा क्षण आनंदोत्सवाने साजरा केला जाणार आहे. मुंबई किनाऱ्यावर वाढत्या प्रदूषणामुळे ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी नामशेष झाली आहेत, तर अलिबागच्या किनाऱ्यावर 40 वर्षांनंतर ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातल्याने त्यांना हा समुद्रकिनारा आता सुरक्षित वाटू लागला आहे.
– समीर शिंदे, आरएफओ, रायगड वन विभाग कांदळवन कक्ष

पहारेकरी ठेवणार

या घरट्याच्या भोवताली तारेचे कुंपण घातले जाणार असून, 24 तास पहारा देण्यासाठी पहारेकरी ठेवण्यात येणार आहे. 30-40 वर्षांत अशा प्रकारची घरटी आढळून आली नव्हती. आजची घटना आमच्यासाठी आनंदाची आहे. याचा आम्ही सर्वजण आनंद साजरा करणार आहोत.
– प्रसाद गायकवाड, सरपंच, किहीम ग्रामपंचायत

(Edited by Avinash Chandane)