Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडRaigad snake bites : काळजी घ्या, सर्पदंश वाढलेत

Raigad snake bites : काळजी घ्या, सर्पदंश वाढलेत

Subscribe

रायगड जिल्ह्यात १६ महिन्यात तब्बल १ हजार ८२० जणांना सर्पदंश झाला आहे. बहुतांश सर्पदंशांच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. मात्र, सरकारी रुग्णालयात सर्पदंशावरील उपचार होत असल्याने केवळ पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

आपलं महानगर वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात रोज ३ ते ४ जणांना साप चावतो. गेल्या १६ महिन्यांत १ हजार ८२० जणांना सर्पाने दंश केला असून त्यातील पाच जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी आहे जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीतील.

सर्पदशांच्या सर्वाधिक तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. शेतीची कामे सुरु असताना सर्पदंश जास्त होतात. मात्र, सरकारी रुग्णालयांतील प्रथमोपचारामुळे सर्पदंश झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार झाले. त्यामुळे त्यांचे जीव वाचले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी दिली.

हेही वाचा… Raigad kids death : दोन चिमुरड्यांचा धावरी नदीत मृत्यू

जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण संस्था कार्यरत असून ही संस्था सर्प, मानव आणि पर्यावरण या विषयावर शून्य सर्पदंश अभियान राबवत आहे. यातून जनजागृती, सर्पदंश, प्रथमोपचार, अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रसार केला जात आहे. संस्थेचे सर्पमित्र वनविभागाच्या मार्गदर्शनात रेस्क्युचे काम करतात. सर्पदंशानंतर सर्वप्रथम डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. मात्र, दंश झाल्यावर असे उपचार तात्काळ शक्य होतातच असे नाही. अशावेळी डॉक्टरांकडे जाईपर्यंत प्रथमोचार आवश्यक असतात.

हेही वाचा… Raigad Khopoli Crime News : हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतून घेतला जीव

साप चावल्यानंतर पहिल्या दोन तासांत प्रथमोपचारासोबतच तात्काळ वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते. अन्यथा विषारी सापाने दंश केलेला असल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते. सरकारी दवाखान्यात वेळेत रुग्ण आणूनही कधी डॉक्टर नाहीत, तर कधी व्हेंटिलेटर ऑपरेटर, तर कधी पुरेशी औषधे नाहीत या कारणास्तव रायगडमधील सर्पदंश रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात.

शेतीची कामे सुरू असताना जमीन तापलेली असते. अशा वेळेला साप, विंचू बाहेर आलेले असतात. कापलेल्या कडपांखाली धान्य खान्यासाठी आलेल्या उंदरांच्या शोधात साप असतात. त्यांना डिवचल्यावर ते दंश करतात. यासाठी शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागते. सर्पदंशाबाबत काही गैरसमजुती आहेत. त्या दूर करणे गरजेचे आहे. या गैरसमजुती खालीलप्रमाणे आहेत…

मंत्राने सापाचे विष उतरते, सर्पदंशावर प्रतिसर्प (स्नेक अँटिव्हेनिन) विष हे एकमेव औषध आहे, व्यक्तीला कडूलिंबाचा पाला, मिरची खायला देणे, जागेवर औषधी वनस्पती उगाळून लावणे, धोतऱ्याच्या बिया खायला देणे, सर्प चावलेल्या जागेवर गरम लोखंडांचा डाग देणे, सर्पदंश होताना तो उलटला तरच विषबाधा होते.

पुरेसा लसींचा साठा

सर्पदंश होणारे बहुतांश गरीब कुटुंबातीलच असतात. ते सरकारी रुग्णालयांचा आधार घेतात. सर्वसामान्यांचा विचार करून पुरेसा लसीचा साठा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.
– डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकीत्सक

सर्पदंश झाल्यास प्रथमोचार

  • सर्पदंश झाल्यास रुग्णास धीर देणे
  • रुग्णास जास्त हालचाल करू देऊ नये
  • जखम स्वच्छ पाण्याने धुवावी
  • सर्पदंश झालेल्या भागाच्या वरच्या बाजूला आवळपट्टी बांधावी
  • दर ५ ते १० मिनिटांनी आवळपट्टी सैल करून पुन्हा बांधावी
  • जखमेला चिरा देऊ नये, सापाला पकडू नये

    (Edited by Avinash Chandane)