माणगाव : रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना न दिल्यास महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी तसेच शिवसेनेच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी पदांचे आणि सदस्यत्वाचे राजीनामे देतील, असा इशारा रायगड जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख स्वाती सखाराम दबडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना दिल्यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. या निषेधार्थ रविवारी शिवसेनेच्या रायगडमधील 38 पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना राजीनामे पाठवले आहेत. त्यानंतर आता महिला आघाडीही आक्रमक झाली आहे.
हेही वाचा… Aditi Tatkare : पालकमंत्रीपदाला स्थगिती, तरीही ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे, महाजन यांनाच
चौथ्यांदा आमदार झालेले महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत गोगावले यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते देऊन कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले. मात्र पालकमंत्रीपदाचा तिढा कायम होता. पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल, असा दावा गोगावले वारंवार जाहीरपणे सांगत होते. प्रत्यक्षात 18 जानेवारी रोजी रात्री पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे गोगावले समर्थक आक्रमक झाले. त्यांनी त्याच रात्री मुंबई गोवा महामार्गावर आंदोलन केले, टायर जाळून रास्ता रोको केला. शिवाय रविवारी शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. अखेर रविवारी रात्री उशिरा रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाना स्थगिती देण्यात आल्याचा आदेश सरकारने काढला.
हेही वाचा… Aaditya Thackeray : मुख्यमंत्री कोणासमोर झुकणार नाहीत असे वाटत होते पण, ठाकरेंची टीका
जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार असताना राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद कसे मिळाले? असा सवाल करत ही बाब मान्य नसल्याचे स्वाती दबडे म्हणाल्या आहेत. जरी आता पालकमंत्रीपदावर स्थगिती देण्यात आली असली तरी पालकमंत्री भरत गोगावलेच व्हायला हवेत अन्यथा सर्व पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांची रांग लागेल, असा इशारा स्वाती दबडे यांनी दिला आहे.
(Edited by Avinash Chandane)