HomeमहामुंबईरायगडPen News : अंगणवाडीतील खाऊच्या पॅकेटमध्ये चक्क मेलेला उंदीर, अंगणवाडी सेविकेमुळे दुर्घटना...

Pen News : अंगणवाडीतील खाऊच्या पॅकेटमध्ये चक्क मेलेला उंदीर, अंगणवाडी सेविकेमुळे दुर्घटना टळली

Subscribe

पनवेल : एकात्मिक बालविकास योजनेतून वाटल्या जाणाऱ्या खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळल्याने पेण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही बाब अंगणवाडी सेविकेच्या निदर्शनास आल्याने लगेचच हे पॅकेट बाजूला करण्यात आले. अन्यथा लहानग्यांच्या जीवाशी खेळ ठरला असता. आता हे खाऊचे पॅकेट पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पेण तालुक्यातील वडखळमधील अंगणवाडी-3 मधून 6 महिने ते 3 वर्षे या वयोगटातील बालकांना घरपोच खाऊचे वाटप केले जाते. या खाऊच्या पॅकेटला मल्टी मिक्स सीरियल्स अँड प्रोटिन्सचे पॅकेट म्हणतात. या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आल्याने बालकांच्या आरोग्याकडे किती गांर्भीयाने पाहण्याची गरज आहे, हे स्पष्ट झाले आहे. ही माहिती मिळताच एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी प्रमोद पाटील यांनी वडखळ ग्रामपंचायतीसमोरील अंगणवाडी-3 ला भेट देऊन सर्व प्रकार जाणून घेतला. शिवाय या खाऊच्या पॅकेटचा पंचनामादेखील करण्यात आला आहे. गटविकास अधिकारी सोनल सूर्यवंशी यांनीही घटनास्थळी जाऊन त्या पॅकेटची पाहणी केली.

हेही वाचा…  Raigad Politics : त्या व्हिडीओत दडलंत तरी काय, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद व्हिडीओपर्यंत

ते पॅकेट कोणते?

एकात्मिक बालविकास योजनेत दिले जाणारे मल्टी मिक्स सीरियल्स अँड प्रोटिन्सचे पॅकेट राज्याबाहेरील कंपनीतून पुरवले जातात. ज्या पॅकेटमध्ये उंदीर आढळला त्याचे बॅच क्रमांक MMCC-1351P उत्पादनाची तारीख 5 जानेवारी 2025 आहे आणि पॅकेटची एक्स्पायरी डेट मे 2025 आहे. दरम्यान, अशा किती पॅकेट बालकांच्या घरी पोहचवले आहेत, याची माहिती घेतली जाईल, असे कळते.

हेही वाचा…  Yavatmal News : विदर्भातील 3 लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत

या घटनेने जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या खाऊच्या पॅकेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता उर्वरित पॅकेटचे वाटप केले जाणार आहे, याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.

(Edited by Avinash Chandane)