HomeमहामुंबईरायगडRaigad Politics : त्या व्हिडीओत दडलंत तरी काय, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद व्हिडीओपर्यंत

Raigad Politics : त्या व्हिडीओत दडलंत तरी काय, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद व्हिडीओपर्यंत

Subscribe

पनवेल : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद केवळ चिघळलाच नाही तर वादाने खालची पातळी गाठली आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्त केल्यानंतर शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यासह कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवीही आक्रमक झाले आहेत. गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर 24 तासांतच पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याची नामुश्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढावली. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने गोगावले यांची उंची काढल्याने आणि त्यांचे गुवाहाटीमधील व्हिडीओ बाहेर काढण्याची धमकी दिल्यामुळे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. या वादाला केव्हा पूर्णविराम मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करणार का, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

हॉटेलमधील व्हिडीओ काढू शकतो

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी पालकमंत्रिपदाच्या वादावरून भरत गोगावले यांची उंची मोजली आहे. गोगावले तुम्ही तुमची उंची पाहून बोलायला हवे होते, असे वक्तव्य करून आम्हाला काढायचेच होते तर गुवाहाटीच्या हॉटेलबाहेरचे आणि आतलेही व्हिडीओ बाहेर काढू शकलो असतो, असा इशारा सूरज चव्हाण शिवसेनेला दिला. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे यांनी या तिघांनाही आवर घालावा अन्यथा त्यांना जशात तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सूरज चव्हाण यांनी दिला आहे.

हेही वाचा…  Raigad Politics : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद, कोण आहे अफजलखान, वाघ आणि कोण आहेत कोल्हे

… तर तटकरेंना फिरणेही मुश्कील

यानंतर शिवसेनेकडून आमदार महेंद्र दळवी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला सडेतोड उत्तर दिले आहे. भरत गोगावले रायगडाच्या कुशीत जन्माला आलेत आणि त्यांची उंची रायगडाएवढी आहे, असे प्रत्युत्तर देतानाच महेंद्र दळवी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. आमचे व्हिडीओ काढण्याची धमकी देता आहात मात्र तुमच्या प्रदेशाध्यक्षांचे व्हिडीओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रातच काय देशातही फिरणे मुश्कील होईल, असे थेट इशारा आमदार दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला तसेच सुनील तटकरे यांना दिला आहे. शिवाय आम्ही खूप काही बोलू शकतो, त्यांनी सबुरीने घ्यावे, असा सल्ला द्यायला महेंद्र दळवी विसरले नाहीत.

पालकमंत्री कोण होणार?

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष दिवसेंदिवस टोक गाठत असताना आणि कुणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे रायगडचा पालकमंत्री कोण होणार, याची चर्चा रायगडमध्ये सुरू आहे. अडीच वर्षांपूर्वी दोन्ही पक्षांतील वादामुळे आणि आदिती तटकरे पालकमंत्रिपदी नको, ही भूमिका घेतल्यामुळे उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरीसोबतच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. आताही तसे होणार का, पालकमंत्रिपद शिवसेनेकडे राहील की शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या भांडणात तिसऱ्याचा म्हणजे भाजपचा लाभ होईल, अशा अनेक चर्चा सध्या रायगडमध्ये सुरू आहेत.

(Edited by Avinash Chandane)