Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडKarjat News : सुरेश लाड यांनी उपोषण का स्थगित केलं, मध्यरात्री 1 वाजता अचानक काय घडलं

Karjat News : सुरेश लाड यांनी उपोषण का स्थगित केलं, मध्यरात्री 1 वाजता अचानक काय घडलं

Subscribe

अलिबाग : कर्जत पोलीस ठाण्यासमोर झोपून बेमुदत उपोषण करणारे माजी आमदार सुरेश लाड यांनी मध्यरात्री उशिरा उपविभागीय अधिकारी वैभव संकपाळ यांच्या उपस्थितीत उपोषण संपवले. शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी झाल्याशिवाय कल्पतरू कंपनीने कंपाउंड वॉलचे बांधकाम करू नये, या मागणीसाठी ते पोलीस ठाण्यासमोर झोपून आंदोलन (20 फेब्रुवारी) करत होते.

कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील कल्पतरू कंपनीने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या, त्याची सीमाबंदी करताना मोजणी करावी. तसेच, शेतकऱ्यांना वेळ द्यावा आणि अतिक्रमण थांबवावे, अशा मागण्या सुरेश लाड यांनी केल्या होत्या. तसेच या प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही सुरेश लाड यांनी केला आहे. विशेषतः पांडुरंग शिर्के (मुक्काम वर्णे) या शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा लाड यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा…  Vohra committee report : वोहरा समितीचा अहवाल केंद्राच्या रेकॉर्डवरून गायब? गृहखात्याचे धक्कादायक उत्तर

गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्यासमोर झोपून आंदोलन करताना सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्यावर मनमानी कारभाराचाही आरोप केला होता. त्यांनी विविध प्रकरणांमध्ये अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. भातखरेदी प्रक्रियेत आदिवासी शेतकऱ्यांची लूट कुणी केली? कब्रस्तानमध्ये पुरलेला मृतदेह खून होता का? युसूफ खान याच्यावर वैयक्तिक रागातून कारवाई केली, या मुद्द्यांकडे सुरेश लाड यांनी लक्ष वेधले होते. सुरेश लाड यांच्या आंदोलनानंतर कर्जत पोलीस ठाण्यात दिवसभर खळबळ उडाली होती. कर्जतमध्ये अनेक सामाजिक क्षेत्रातील तसेच भाजपची संपूर्ण टीम यानिमित्ताने रस्त्यावर उतरलेली दिसली. दरम्यान, रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांची मध्यस्थीही यशस्वी ठरली नाही.

Karjat News Suresh Lads hunger strike suspended after demands accepted Karjat Police station Raigad district kalpataru project

हेही वाचा…  Raigad News : महाडजवळ रसायनाचा टँकर उलटला, त्यानंतर काय घडलं

रात्री उशिरा कर्जत-खालापूरचे उपविभागीय अधिकारी वैभव संकपाळ यांनी मध्यस्थी करून एक पत्र जारी केले. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकारी, अधीक्षक भू-अभिलेख रायगड आणि कंपनी प्रशासनातील संपर्क अधिकारी श्री. चोरगे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांनी भू-अभिलेख खात्याकडे मोजणीसाठी तात्काळ अर्ज करावा आणि दोन दिवसांत मोजणी शुल्क भरावे. त्यानंतर विशेष बाब म्हणून संबंधित जमिनीची मोजणी तातडीने करण्यात येईल. मोजणी पूर्ण होईपर्यंत कंपनीला संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवर कंपाउंड वॉलचे बांधकाम न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस प्रशासनालाही निर्देश दिले आहेत, असे लेखी आश्वासन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजता माजी आमदार सुरेश लाड यांनी उपोषण सोडले. यावेळी भाजप पदाधिकारी, समर्थक, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

(Edited by Avinash Chandane)