पनवेल : रायगड जिल्ह्यातील इंदापूर रेल्वे स्टेशनमधील गैरसोयींमुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. कोकण रेल्वेला 25 वर्षे झाली तर मुलभूत सुविधांचा इंदापूर रेल्वे स्टेशनवर अभाव आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटना, रायगड यांनी 26 जानेवारीपासून इंदापूर स्टेशनमध्ये उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांच्यासोबत अॅड. राकेश मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ घाडे हेदेखील उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे आता कोंकण रेल्वे प्रशासन या इशाऱ्याला कसा प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोंकण रेल्वेवरील माणगाव आणि कोलाड दरम्यान इंदापूर रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनमधील मुख्य व्यथा म्हणजे पादचारी पूल नाही. एकीकडे रुळावरून उतरणे गुन्हा आहे, अशी सूचना वारंवार रेल्वेकडून केली जाते. त्याचवेळी पादचारी पुलाअभावी इंदापूरमधील प्रवाशांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. पादचारी पुलाअभावी प्रवाशांना रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर जावे लागते. गंभीर बाब म्हणजे जर मालगाडी उभी असेल तर मालगाडीखालून प्रवाशांना जावे लागले. इतकी भयानक परिस्थिती असताना कोंकण रेल्वे प्रशासनाला याचे अजिबात गांभीर्य नाही.
हेही वाचा… लाखमोलाचा अटल करंडक एकदम कडक नाट्यसंस्थेला, पाटी ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, रायगडचे मिलिंद साळवी दोन वर्षांपासून इंदापूर रेल्वे स्टेशनमधील मुलभूत सुविधांसाठी दोन वर्षांपासून पत्रव्यवहार करत आहेत, निवेदने देत आहे. मात्र, त्यांच्या निवेदनाची दखल घेण्याचे सौजन्यही कोंकण रेल्वे प्रशासन दाखवत नाही. म्हणून आता त्यांनी रेल्वे प्रशासनाली अंतिम इशारा दिला आहे. इंदापूर रेल्वे स्टेशनमध्ये 20 जानेवारीपर्यंत मुलभूत सुविधा उपलब्ध न केल्यास 26 जानेवारी रोजी उपोषण करणार, अशा इशारा मिलिंद साळवी यांनी दिला आहे. साळवी हे बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारीदेखील आहेत.
कोंकण रेल्वेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. एखाद्या रेल्वे स्टेशनमध्ये पादचारी पूल नसावा किंवा त्यासाठी नियोजन नसावे, हे रेल्वे प्रशासनानचे अपयश आहे. एवढे करूनही कुणी पाठपुरावा करूनही त्याला प्रतिसाद मिळत नसेल, तर ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे काही बळी गेल्यावर कोंकण रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे का, असा स्वाल इंदापूरमधील प्रवासी आणि विभागात ग्रामपंचायती विचारत आहेत. या ग्रामपंचायतींनीही इंदापूर रेल्वे स्टेशनवर किमान सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे ठराव ग्रामसभेत मंजूर केले आहेत. तरीही कोंकण रेल्वे दखल घेत नाही.
(Edited by Avinash Chandane)