HomeमहामुंबईरायगडMaghi Ganeshotsav : पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात असा होईल माघी गणेशोत्सव

Maghi Ganeshotsav : पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात असा होईल माघी गणेशोत्सव

Subscribe

पाली : अष्टविनायक क्षेत्रांपैकी एक असलेल्या पालीतील बल्लाळेश्वर देवस्थान माघी गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. माघी गणेशोत्सव हा उत्सव 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत येतात. यंदा दीड लाख भाविक येण्याची शक्यता असून त्यासाठी देवस्थानने सर्व तयारी केल्याचे बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जीतेंद्र गद्रे यांनी सांगितले.

पाली नगरपंचायत आणि बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था केल्या आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलीस विभागाने यात्रा स्थळी चोख बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था केली आहे. यावर्षीच्या माघी गणेशोत्सवात भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजने आयोजित केली आहेत. यात्रेत गोड खाऊ आणि हॉटेल स्टॉल्सची रेलचेल असते. लहान मुलांसाठी खेळणी आणि पाळण्यांचे स्टॉल्सही असतील. यात्रेत सहभागी होणाऱ्या गोरगरीब आणि स्थानिक दुकानदारांसाठी ही एक मोठी संधी आहे. बल्लाळेश्वरच्या माघी गणेशोत्सवाची यात्रा सुरळीत होण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट हे समन्वयाने काम करत आहेत.

हेही वाचा…  Siddhivinayak temple : सिद्धिविनायक मंदिरातील ड्रेस कोडला सदावर्तेंच्या मुलीचा विरोध; राष्ट्रीय महिला आयोगात केली तक्रार

देवस्थानाची व्यवस्था

गणेश जयंतीच्या दिवशी पालीत येणाऱ्या भाविकांना चहा आणि नाष्टा देवस्थानकडून विनामूल्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पंचमीला सर्व भाविकांना महाप्रसाद म्हणून विनामूल्य भोजनाची व्यवस्था आहे, अशी माहिती बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जीतेंद्र गद्रे यांनी दिली.

(Edited by Avinash Chandane)