पनवेल : शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाडच्या भूमीत आणखी एक ऐतिहासिक घटना 98 वर्षांपूर्वी घडली होती. ती घटना होती चवदार तळ्याची. महाडमधील तळे अस्पृश्याना खुले करण्याचा भीमपराक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. तो दिवस होता 20 मार्च 1927. या ऐतिहासिक घटनेचा 98 वा वर्धापन दिन येत्या गुरुवारी (20 मार्च) साजरा होणार आहे. हा वर्धापन दिन भव्य आणि ऐतिहासिक करण्यासाठी रिपाइं आठवले गटाकडून परिसराची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेण्यात आला. 20 मार्च रोजी चवदार तळ्यावर महामानव डॉ. आंबेडकर यांना पोलिसांकडून मानवंदना दिली जाणार आहे.
चवदार तळ्याच्या ऐतिहासिक घटनेनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक, पुरोगामी विचाराचे मंडळी महाडमध्ये येतात. यावेळी येणाऱ्यांची उत्तम सोय व्हावी, चांगली व्यवस्था करण्यात यावी, यावर भर दिला जात आहे. प्रशासनाकडून अचूक नियोजन व्हावे याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) रायगड जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (11 मार्च) महाड शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी त्यांनी चवदार तळे आणि क्रांतिभूमी परिसराची पाहणी करत प्रशासनाच्या नियोजनाचा आढावा घेतला.
19 आणि 20 मार्च रोजी राज्यातून क्रांतिभूमीत येणाऱ्या अनुयायांना पिण्याचे पाणी, भोजन, राहण्याची व्यवस्था, पार्किंग, शौचालय आदी आणि वैद्यकीय सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आणि महाड तालुकाध्यक्ष मोहन खांबे यांनी केली. तसेच रात्री उशिरा एसटी गाड्यांची सुविधा नसल्याने प्रबोधनात्मक कार्यक्रमास रात्री उशिरापर्यंत सादर करण्याची परवानगी द्यावी किंवा येथून घरी जाण्यासाठी एसटी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
अभिवादनासाठी कोण कोण येणार?
डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच रायगडातील महायुतीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नरेंद्र गायकवाड यांनी दिली.
या बैठकीला कोकण प्रदेश युवक कार्याध्यक्ष अमित मोरे, उपाध्यक्ष सुदास मोरे, सदस्य केशव हाटे, तालुका सचिव लक्ष्मण जाधव, रोहा तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव, महाड तालुका उपाध्यक्ष अशोक मोहिते, प्रमोद शिर्के, सुरेश धोत्रे, ज्येष्ठ नेते अनंत तांबे, माणगाव तालुका उपाध्यक्ष प्रदीप जाधव, संजोग जाधव, महाड शहराध्यक्ष प्रभाकर खांबे, नरेश साळवी, जगदीश वाघमारे, विजय उतेकर, गंगाराम भोसले, सिध्दार्थ सकपाळ आदी उपस्थित होते.
(Edited by Avinash Chandane)