खोपोली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये शिवसेनेचे तीन आमदार असतानाही राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद देण्याचा चुकीचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळेच सत्तांतर झाले. यात रायगडमधील तिन्ही आमदारांचे मोठे योगदान होते. आता महायुतीचे सरकार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीत राहून विश्वासघात करणाऱ्या तटकरे यांच्याच घरात पालकमंत्रीपद देणार असाल तर तटकरे कुटुंबाला आम्ही स्वीकारणार नाही. यात आमचा राजकीय अस्त झाला तरी पर्वा नाही, अशी रोखठोक भूमिका कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना दिल्यानंतर शिवसेनेचे भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे या तिन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी याबाबत टोकाची भूमिका घेतली आहे. त्याचवेळी पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा… Aditi Tatkare : पालकमंत्रीपदाला स्थगिती, तरीही ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे, महाजन यांनाच
राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हा गोगावले मंत्री व्हावे, ही सर्वांची इच्छा होती. आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार असून गोगावले पालकमंत्री व्हावेत, अशी सर्व आमदारांची इच्छा होती. तशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सांगितले होते. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. परंतु, महायुतीत राहून विश्वासघात करणाऱ्या तटकरे यांच्याच घरात पालकमंत्री देणार असाल तर आम्ही विरोध करणाच. पालकमंत्रीपद भाजपला दिले तरी चालेल परंतु विश्वासघात होणार असेल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा आमदार थोरवे यांनी दिला आहे.
(Edited by Avinash Chandane)