पनवेल : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यांतर्गत पनवेल महापालिकेने विविध उपक्रम राबवले आहेत. यात महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून काव्यवाचन, वक्तृत्व, निबंध शिवाय प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. तसेच राज्यगीत प्रसारासाठी फलकाचे अनावरण असे विविध उपक्रम राबवण्यात आले. याशिवाय महापालिका काव्यसंमेलन आणि काव्य स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
पनवेल महापालिकेच्या 10 शाळांमधून ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. या काळात शुध्द लेखन, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्याना मराठी भाषेची समृद्धता कळावी, महत्त्व कळावे या उद्देशाने घेण्यात आलेल्या या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग होता.

राज्यगीताचा फलक
मराठी राजभाषेचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी सरकारने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यास सांगितले होते. याचाच भाग म्हणून राज्यगीताचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा म्हणून मंगळवारी (28 जानेवारी) आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते राज्यगीताच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, सहाय्यक आयुक्त स्वरुप खारगे, उपअभियंता विलास चव्हाण, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर उपस्थित होते. चार प्रभाग कार्यालये आणि नाट्यगृहातही राज्यगीताचे फलक लावण्यात येणार आहेत.
(Edited by Avinash Chandane)