पनवेल : राज्यात विशेषता मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात परप्रांतीयांकडून मराठी माणसांना त्रास देण्याचे प्रकार सुरू असताना आता असाच प्रकार पनवेल तालुक्यात आढळून आला आहे. पनवेलच्या भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या मराठी कुटुंबाला त्रास दिला जात होता. गायकवाड कुटुंबाचा भाडेकरार संपल्यानंतर ते ते दुसऱ्या घराचा शोध घेत होते. तसे त्यांनी घरमालकाला कळवले होते. मात्र, त्यांचे मुल लहान असल्याने घरमालकाने त्यांना राहण्याची परवानगी दिली होती. असे असतानाही या सोसायटीच्या महिला चेअरमन वसुंधरा शर्मा गायकवाड कुटुंबाला घर सोडण्यासाठी सतत त्रास देत होती, शिवीगाळ करत होती. अखेर मनसेने दम दिल्यानंतर मात्र वसुंधरा शर्माने सपशेल माफी मागितली असून यापुढे मराठी माणसांना त्रास देणार नाही, असे स्पष्ट केले.
हेही वाचा… Kalyan : डोंबिवलीत सोसायटीत हळदी कुंकू कार्यक्रमावरून मराठी-अमराठी वाद
पनवेल-खोपोली महामार्गालगत भोकरपाडा येथे हिरानंदानीची भव्य वसाहत विकसित होत आहे. इथे गायकवाड कुटुंब भाड्याने राहात आहे. या कुटुंबाला इथली चेअरमन वसुंधरा शर्मा त्रास देत होत्या. मराठी माणसांची इथे राहण्याची लायकी नाही नाही, असे वारंवार म्हणत होत्या. या महिलेने यापूर्वी हिरानंदानीमध्ये काम करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढले आहे, इतका मराठी माणसाचा द्वेष त्या करतात. अखेर गायकवाड कुटुंबाने मनसेकडे मदत मागितल्यावर मनसेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष अदिती सोनार यांनी वसुंधरा शर्मा यांना त्यांच्या अरेरावीचा जाब विचारल्यानंतर शर्मा बॅकफूटवर गेल्या. त्यानंतर यापुढे कोणत्याही मराठी माणसाला त्रास देणार नाही, अशी ग्वाही वसुंधरा शर्मा यांनी दिली.
चेअरमन वसुंधर गायकवाड यांच्या त्रासामुळे गायकवाड यांना हृदयाचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे मनसेच्या अदिती सोनार यांनी वसुंधरा शर्मा यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी शर्मांच्या विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली आहे. मनसेच्या पुढाकारानंतर सोसायटीतल्या इतर मराठी रहिवाशांनीही याच स्वरुपाच्या तक्रारी केल्यात. त्यामुळे वसुंधरा शर्मा यांनी सर्वांची माफी मागितली आहे.
(Edited by Avinash Chandane)