HomeमहामुंबईरायगडMatheran News : बापरे, घाट चढताना कार पेटली, कशी घडली ही दुर्घटना

Matheran News : बापरे, घाट चढताना कार पेटली, कशी घडली ही दुर्घटना

Subscribe

माथेरान : काही महिन्यांत रस्त्यावरून पळणाऱ्या गाड्या पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. अचानक गाड्या पेटत असल्यामुळे चिंता वाढली आहे. अशातच शुक्रवारी माथेरान घाटात अशाच प्रकारची आणखी एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे माथेरान घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या कारमध्ये एक दाम्पत्य होते. ते सुरक्षित असून एका टॅक्सीचालकाच्या सतर्कतेमुळे कार पेटल्याचा प्रकार उघड झाला. हे दाम्पत्या नवी मुंबईतून माथेरानला भटकंतीसाठी येत होते. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कार पेटण्याची दुर्घटना घडली.

नवी मुंबईतील एक दाम्पत्य (MH-43-AN-9468) कारने माथेरानला जात होते. माथेरान घाटातून त्यांची कार चढत असताना कारने अचानक पेट घेतला. ही बाब कारमधील दाम्पत्याच्या लक्षात आली नाही. मात्र, स्थानिक टॅक्साचालकाला पर्यटकाची कार पेटल्याचे लक्षात आले. त्या टॅक्सीचालकाने ही बाब लगेचच कारचालक दाम्पत्याच्या लक्षात आणून दिली. ते दाम्पत्य लगेचच कारमधून बाहेर पडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर कार वेगाने पेटत गेली. या घटनेनंतर माथेरान घाटावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आणि दोन्ही बाजूंना काही वेळातच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा…  Railway Accident : कानात इअरफोन घालून रुळावरून चालणं जीवावर बेतलं; रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

या दुर्घटनेची माहिती नेरळ पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळावर येत अग्निशमन दलाला बोलावले. मात्र, अग्निशमन दलाची गाडी येण्यास उशीर झाल्यामुळे संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी गेली. टॅक्सीचालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. पण, जोडप्याचे मोबाईल, वॉलेट आणि बॅग आगीत खाक झाले.

घाटात हे टाळा

माथेरानला जाण्यासाठी घाट चढावा लागतो. नेरळ-माथेरान घाट हा चढ उताराचा असून अनेक पर्यटक घाटात वाहनाचा एसी सुरू ठेवतात. त्यामुळे इंजिन खूप गरम होऊन गाडी पेटण्याचे प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच पर्यटकांनी घाट सुरू होण्यापूर्वी वाहनाचा एसी बंद करून प्रवास करणे जास्त सुरक्षित असते. त्यामुळे गाडी जास्त गरम होत नाही शिवाय एसी बंद ठेवल्याने घाटातून गाडीचा वेग वाढण्यास मदत होते.

(Edited by Avinash Chandane)