HomeमहामुंबईरायगडMahad News : धान्य, कडधान्ये अन् प्रयोगाचे सूर्यफुल, महाड तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्याची...

Mahad News : धान्य, कडधान्ये अन् प्रयोगाचे सूर्यफुल, महाड तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्याची कमाल

Subscribe

महाड : कोकणात भातशेतीकडे दुर्लक्ष होत असल्याने पडीक जमीन वाढत आहे. अशातच प्रयोगशील शेतकरी दीपक अमराळे यांनी बहुपिकाच्या माध्यमातून सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केल्याने भविष्यात सूर्यफुलाची शेती आर्थिक चमत्कार घडवू शकेल, अशी स्थिती आहे. महाड तालुक्यातील करंजखोल गावातील दीपक पांडुरंग अमराळे यांनी 2009 मध्ये दासगावात एक एकर पडीक जमीन विकत घेतली. तेव्हापासून ते त्या जमिनीत शेतीविषयक प्रयोग करत आहेत. यंदा त्यांनी बहुपिकाच्या माध्यमातून सूर्यफुलाचे भरघोस उत्पादन केले आहे. प्रयोग म्हणून केलेल्या या सूर्यफुलाचे दर्शन झाल्यानंतर दीपक अमराळे यांना अत्यानंत झाला आहे.

हेही वाचा…  Panvel Problem : याला रस्ता म्हणायचा की वाहनतळ, स्टेशन रोडवर नवीन पनवेलमध्ये वाहतुकीचा बट्ट्याबोळ

रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र, बदलत्या काळात शेतकऱ्यांचा जमिनी विकण्याकडे किंवा परवडत नसल्याने पडीक ठेवण्याकडे कल वाढत आहे. तरुण पिढी मुंबई, पुण्याकडे स्थलांतरित झाल्याने शेती कोण करणार म्हणून शेतीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

दीपक अमराळे यांच्या शेतातील सूर्यफुलाला लागलेली उत्तम दर्जाची फुले

असे असताना आपल्या लाल मातीत विविध प्रयोग करून उत्पादन घेता येऊ शकते, असा आशावाद बाळगून दीपक अमराळे यांनी एक एकरमध्ये विविध कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या लागवडीला सुरुवात केली. यात वाल, मटकी, चवळी, तीळ, सूर्यफूल, उडीद, ज्वारी, मका अशी विविध बिजे पेरून शेती करण्याचा प्रयोग केला. यामध्ये त्यांना यश मिळू लागले आहे.

हेही वाचा…  Raigad Politics : महेंद्र थोरवे यांची आमदारकी राहणार की जाणार, सुधाकर घारे यांच्या याचिकेत काय दडलंय

अमराळे यांनी ज्वारीचे उत्पादन घेतल्यानंतर स्वतःसाठी काही भाग ठेऊन उर्वरित ज्वारीची विक्री केली. यात त्यांना चांगला फायदा झाला. पावसाळ्यात नाचणी, भात आणि भुईमुगाचे पीकदेखील घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कोकणात पावसाळ्यात केवळ भातशेती करून उर्वरित महिन्यांमध्ये शेत रिकामे असते. भातकापणीनंतर या मातीमध्ये बऱ्यापैकी ओलावा टिकून राहतो. या दलदल असलेल्या जमिनीमधून वाटेल ते पीक घेता येते. विनापाण्याने दीपक अमराळे यांनी सूर्यफूल, वाल, मटकी, चवळी, तीळ पिकवले आहेत. सूर्यफुलाला उत्तम दर्जाची फुले आल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बहुपिकामध्ये उंच वाढणाऱ्या पिकाच्या बुंध्याशी इतर वेलवर्गीय कडधान्य, भाजीपाला लावल्यानंतर एका शेतामध्ये अनेक पीक घेण्याची संकल्पना पूर्ण करता येते. या मातीमध्ये काहीच होत नाही, असे म्हणणे योग्य नाही. यातूनच उत्पन्न मिळवून स्थलांतर रोखता येणे शक्य आहे, असे अमराळे यांनी सांगितले.

प्रयोग केल्यामुळे यश मिळाले

मी या जमिनीत 2009 पासून प्रयोग करत आहे. या लाल मातीत ज्वारी पिकवली, कडधान्य पिकवले आणि सूर्यफुलाची यशस्वी लागवड केली आहे.
– दीपक अमराळे, प्रयोगशील शेतकरी

(Edited by Avinash Chandane)