पनवेल / महाड : दीड दशकापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होईल, याची प्रतीक्षा रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मक बातमी दिली आहे. या वर्षाच्या अखेरीस मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा सुस्साट होणार आहे. त्याचवेळी महामार्गाचे काम अर्धवट करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल आणि त्यांना भविष्यात कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असा इशारा शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.
हेही वाचा… Raigad Earthquake : रायगडमध्ये भूकंपाचे धक्के, पेण, सुधागड तालुका हादरला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची गुरुवारी (20 फेब्रुवारी) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पाहणी केली. पनवेलजवळील पळस्पे फाटा येथून हातखंबा रत्नागिरी असा त्यांचा पाहणी दौरा होता. पळस्पे फाटा येथून त्यांनी पाहणी दौरा सुरू करण्यापूर्वी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पेणमध्ये खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील आदींनी मंत्री महोदयांची भेट घेऊन महामार्गाच्या कामाला वेग देण्याची विनंती केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते महाडपर्यंत गेले आणि तेथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

हेही वाचा… Alibag News : जयंत पाटलांची जागा चित्रलेखा पाटील घेतील, राजू शेट्टी यांचे भाकीत
माणगाव, इंदापूर बायपास या रस्त्याच्या नव्याने निविदा काढण्यात आल्या असून निविदा प्रक्रियेचे काम फेब्रुवारीअखेरपर्यंत पूर्ण होईल. तसेच विविध ठिकाणी असणारे सर्विस रोड या ठिकाणची कामे एप्रिलअखेर मार्गी लागतील असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. तसेच गणेशोत्सवापूर्वी रस्त्याबाबत कोणती समस्या राहता नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. पनवेल ते झाराप दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे 10 टप्पे आहेत. त्यातील सात टप्प्यांची कामे पूर्ण झाली आहेत, असे मंत्री महोदयांनी सांगितले. दरम्यान, पोलादपूर सर्व्हिस रोडचे काम वर्क ऑर्डर मिळूनही सुरू झाले नसल्याकडे लक्ष वेधल्यावर याची माहिती घेऊन हे काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले उपस्थित होते.
तोपर्यंत टोल आकारणी नाही
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत कुठल्याही प्रकारची टोल आकारणी केली जाणार नाही.
– शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
(Edited by Avinash Chandane)