पनवेल : मुरुडमधील परेश नाका ते एकदरा पूल हा रस्ता प्राधान्याने तयार करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतले आहे. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी उपोषण स्थगित केले आहे. मात्र, महिनाभरात रस्त्याचे काम सुरू न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा गायकर यांनी दिला आहे. त्यामुळे पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर गायकर यांच्या आंदोलनाची टांगती तलवार कायम आहे.
हेही वाचा… Karjat News : सुरेश लाड यांनी उपोषण का स्थगित केलं, मध्यरात्री 1 वाजता अचानक काय घडलं
मुरुड शहरातील परेश नाका ते एकदरा पूल या 1.8 किलोमीटर रस्त्यासाठी जुलै 2023 मध्ये वर्क ऑर्डर काढण्यात आली होती. हे कंत्राट सुप्रभात इफ्राझोन प्रा. लि. या कंपनीने मिळवले आहे. कामासाठी सहा महिन्यांची मुदत असताना कंत्राटदार कंपनीने दीड वर्ष झाले तरी काम सुरू केले नाही. विशेष म्हणजे या कामासाठी निधी उपलब्ध असूनही काम होत नसल्याने मुरुडकर संतप्त झाले आहेत. या संतापाला पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष आणि सामजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांना वाट करून दिली. त्यांनी 4 फेब्रुवारी रोजी मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देत या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा अन्यथा 17 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. मात्र, या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने सकारात्मक पाऊल न उचलल्याने गायकर यांनी 17 फेब्रुवारीपासून तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
लोकांचा वाढता रोष पाहून आमदार महेंद्र दळवी यांनी अरविंद गायकर यांची गुरुवारी उपोषणस्थळी भेट घेतली. दरम्यान, अलिबाग सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप कार्यकारी अभियंता यांनी त्याच दिवशी पत्र देत एक महिन्यात रस्त्याचे काम सुरू करण्याचे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर अरविंद गायकर यांनी 20 फेब्रुवारी रोजी उपोषण मागे घेतले. या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने दीड वर्षांपूर्वी 80 लाखांची निविदा काढली आहे. एवढे असूनही रस्ता तयार होत नसल्याने मुरुडकर आणि पर्यटकांचे हाल होत आहेत. त्यामुळे कंत्राटदार काम करणार नसेल तर त्याला काळ्या यादीत टाका आणि दुसऱ्या कंत्राटदाराला काम देऊन रस्त्याचे काम पूर्ण करा, अशी मागणी गायकर यांनी केली आहे.
(Edited by Avinash Chandane)