मुरुड : दिवाळी, गोकुळअष्टमी, मकरसंक्रात असे सण किंवा कडक उन्हाळा सुरू झाला की सर्वांना कुंभारआळी आणि कुंभारकलेची आवर्जून आठवण होते. म्हणजेच वर्षभर येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांत दिवा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. मुरुडमध्ये असेच एक कुटुंब आहे ज्यांनी कुंभारकला जपली आहे, वाढवली आहे. ते कुटुंब आहे राजापूरकर! मुरुड शहराच्या कुंभारवाड्यातील तारामती हरिश्चंद्र राजपूरकर ही दिवंगत परशुराम राजपूरकर यांची चौथी पिढी. तारामती राजपूरकर आजही तेवढ्याच उत्साहाने आणि तन्मयतेने कुंभारकला जोपासून उदरनिर्वाह करत आहेत.
दिवंगत परशुराम राजपूरकर यांनी तत्कालीन परिस्थितीत कुंभारकलेल्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्याकाळात दुकान तसेच वाहन नसल्याने घरात फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन तयार केलेली भांडी वस्तू ते डोक्यावर घेऊन गावोगावी विकत असत. वर्षभर त्यांच्या पायाला भिंगरी असायची. पुढे आनंदी परशुराम राजपूरकर यांनीही कठीण परिस्थितीत कुंभारकलेच्या माध्यमातून कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली.
हेही वाचा…
आता तारामती हरिश्चंद्र राजपूरकर या रुपेश हरिश्चंद्र राजपूरकर आणि रिना रुपेश राजपूरकर यांच्या मदतीने कुंभारकलेचा वारसा पुढे नेत आहेत. डिझाईनचे मडके, पणत्या, चुली, थंडगार पाण्यासाठी मडके, तवे, तुळस वृंदावन, गुंड्या, ध्रुपाजंन, मिरची भाताचा खापर आदींसह निरनिराळ्या वस्तू बनवून त्यांची बाजारात विक्री करत आहेत.
बाजारभावापेक्षा कमी किमतीत या वस्तू मिळत असल्याने ग्राहकांचीही त्यांना पसंती मिळत आहे. सध्या बाजारात चिनी भांडी, चिनी दिव्यांची घुसखोरी झाली आहे. त्यांना स्पर्धा करत राजपूरकर कुटुंब कुंभारकला जपत आहे. असे असले तर उदरनिर्वाह होत आहे फार नफ्याची अपेक्षा ठेवता येत नाही. त्यामुळे आमची पुढची पिढी कुंभारकलेत रमेल, कुंभारकळा जपेल हे आताच सांगता येत नाही, असे रिना राजपूरकर यांनी सांगितले. घर सांभाळून सासूच्या जोडीला रिना राजपूरकर या कामात झोकून देतात. पुढची पिढी हा व्यवसाय करेल की नाही हे सांगता येत नसले तरी माझी लहान मुले या व्यवसायात मदत करत आहेत, ही जमेची बाजू असल्याकडे रिना राजपूरकर लक्ष वेधत आहेत. हा वर्षभर चालणारा व्यवसाय असून सणासुदीच्या काळात वस्तुंची विक्री चांगली होते, अशी माहिती रिना राजपूरकर यांनी दिली.