Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडMurud News : गायकरांच्या उपोषणाचा दणका, मुरुडच्या रस्त्यासाठी खडी रेती पोहोचली

Murud News : गायकरांच्या उपोषणाचा दणका, मुरुडच्या रस्त्यासाठी खडी रेती पोहोचली

Subscribe

पनवेल : मुरुड शहरातील परेश नाका ते एकदरा पूल हा 1.8 किलोमीटरचा रस्ता नव्याने बनवावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी 17 फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेत आमदार महेंद्र दळवी यांच्या मध्यस्थीने दोन दिवसांनी गायकर यांनी उपोषण मागे घेतले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने महिनाभरात रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची लेखी ग्वाही दिली होती. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून रस्त्याच्या कामासाठी रेती, खडी आदी साहित्य आले आहे.

पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष आणि सामजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी परेश नाका ते एकदरा पूल हा रस्ता तयार करण्याची मागणी लावून धरली आहे. जुलै 2023 मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने या कामाची वर्क ऑर्डर काढली होती. तेव्हापासून कंत्राटदार सुप्रभात इफ्राझोन प्रा. लि.ने कामाला सुरुवात केली नव्हती. विशेष म्हणजे दीड वर्षे काम न केल्याने 4 फेब्रुवारी रोजी मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देत या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा अन्यथा 17 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार, असा इशारा अरविंद गायकर यांनी दिला होता.

हेही वाचा…  Water Shortage : रायगडमध्ये जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ, रांजणखार डावली ग्रामस्थांचा हंडा मोर्चा

दिलेल्या मुदतीत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 17 फेब्रुवारीपासून गायकर उपोषणाला बसले. त्यांना मुरुडमधील चांगला पाठिंबा मिळत गेला. त्यानंतर दोन दिवसांनी आमदार महेंद्र दळवी यांनी मध्यस्थी करत गायकर यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी महिनाभरात काम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पीडब्लूडी अधिकाऱ्यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी कंत्राटदार सुप्रभात इफ्राझोन कंपनीकडून रस्ता बनवण्यासाठी खडी तसेच इतर साहित्य खोकरी माझेरी येथे आणण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात लवकरच होईल, असे दिसते.

पावसाळ्यापूर्वी रस्ता तयार न झाल्यास या रस्त्यावरून जाण्याची शिक्षा लोकांना भोगावी लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी गायकर यांनी केली आहे. म्हणूनच सोमवारी मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देत 20 मार्चपूर्वी रस्त्याचे काम सुरू न केल्यास स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी गायकर यांच्यासोबत देवेंद्र सतविडकर, उत्तम पाटील, शहानवाज दाऊद बा, वसीम अन्सारी, मुनावर कादेरी उपस्थित होते. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने दीड वर्षांपूर्वी 80 लाखांची निविदा काढली होती. निधी उपलब्ध आहे, तरीही रस्त्याचे काम सुरू न केल्यामुळे मुरुडकर संतप्त झाले होते.

(Edited by Avinash Chandane)