पनवेल : निधी उपलब्ध असूनही कंत्राटदाराच्या बेफिकीरीमुळे मुरुड परेश नाका ते एकदरा पुलापर्यंतचा फक्त दोन किलोमीटरचा रस्ता दोन वर्षांपासून खोळंबला आहे. यामुळे मुरुडकर संतप्त झाले असून रस्त्याचे काम सुरू न केल्यास उपोषणाला बसू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी दिला आहे. या संदर्भात पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष आणि सामजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग तातडीने कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण?
मुरुडमधील परेश नाका ते एकदरा पूल (समुद्र लाईन-मच्छीमार्केट मार्गे) हा रस्ता अनेक वर्षे नव्याने बनला नाही. मुरुडकर आणि पर्यटकांचे या रस्त्यावरून येताना हाल होत आहेत. याबाबत अनेकदा मागण्या केल्यानंतर या रस्त्यासाठी सरकारने निधी दिला. हा रस्ता 1.8 किलोमीटरचा असून दोन वर्षांपूर्वी हा रस्ता तयार करण्यासाठी 80 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर कंत्राटदाराला कंत्राट मिळाले. पण, दोन वर्षे उलटली तरी या कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली नाही.
हेही वाचा… Raigad News : रायगडमध्ये चाललंय तरी काय, रोहा खालापुरात गुरे चोरीच्या घटना, गुरे चोर मुरुडचे

काय आहे मागणी?
निधी असूनही कंत्राटदार काम सुरू करत नसेल तर त्याला काळ्या यादीत टाका आणि दुसऱ्या कंत्राटदाराला काम देऊन रस्त्याचे काम पूर्ण करा, अशी मागणी अरविंद गायकर यांनी केली आहे. एवढेच नाही तर आमच्या निवेदनाची दखल घेऊन पाच दिवसांत आम्हाला कळवावे किंवा चर्चेला बोलवावे, अशी मागणी गायकर यांनी केली आहे. तसेच वेळेत निर्णय न घेतल्यास 17 फेब्रुवारीपासून मुरुड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशाराही गायकर यांनी निवेदनातून दिला आहे.
हेही वाचा… Pen News : खुशबू ठाकरेच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा, जनजागृती आदिवासी संस्थेची मागणी
झळ कुणाला?
मुरुड हे पर्यटनाचे शहर आहे. रोज शेकडो पर्यटक मुरुडमध्ये येत असतात. मात्र, खराब रस्त्यामुळे पर्यटकांमध्ये मुरुडची प्रतिमा खराब होते. शिवाय खराब रस्त्यामुळे मुरुडकरांना आणि पर्यटकांनाही त्रास होत आहे. गायकर यांनी या पत्राची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, मुरुड तहसीलदार, पोलीस अधीक्षक तसेच आमदार महेंद्र दळवी यांनाही दिली आहे.
(Edited by Avinash Chandane)